जिल्हा सामान्य रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी
*जिल्हा सामान्य रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी *
कोरोनाकाळात गरोदर महिलांची सुखरूप सुटका करण्याची बाब सर्वात महत्वाची व प्राधान्याची आहे. आज कोरोना साथीने घातलेले थैमान सर्वश्रुत आहे. गाव, शहरांतील अनेक खाजगी व शासकीय रुग्णालये आज कोरोना रुग्णांनी व्यापलेली आहेत. इतके असूनही कोरोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी सर्वांचीच मोठी तारांबळ उडते. अशात एखादी गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह झाली तर अडचणींना पारावारच राहत नाही. मग त्या महिलेचे व तिच्या कुटुंबियांचे हाल यांना सीमाच उरत नाही. मात्र तशाही परिस्थितीत काही डॉक्टर देवदूत म्हणून धावून येत असतात. त्यातल्या त्या सरकारी आरोग्य सेवेमधील डॉक्टरांप्रती असलेली जनमानसांतील उदासीनता आपल्या कृतीतून पुसण्याचा प्रयत्न काही ध्येयवेड्या सरकारी डॉक्टरांचा दिसून येतो. ही संवेदनशीलता बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये सातत्याने दिसून येते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोविड महामारीच्या काळात अविरतपणे सेवा बजावण्याचे काम सरकारी यंत्रणा करत आहेत. दिवसरात्र रुग्णसेवेत व्यस्त असणारे अनेक डॉक्टर समाजाप्रती संवेदशीलता जपण्याचा प्रयत्न कसोशीने करताना दिसतात. नुकतीच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली एक घटना ह्याच संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी आहे. विक्रमगडच्या शांता नामक आदिवासी महिलेचं हिमोग्लोबिन अवघे तीन झाले होते. तशातच ती करोना पॉझिटिव्ह निघाल्याने बाळंतपण कसं पार पडणार ही चिंता सर्वांना होती. ठाणे जिल्ह्यातील मोखाड्याच्या डॉक्टरांनी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दूरध्वनी करून ही माहिती देताच त्यांनी तात्काळ शांताला ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यास सांगितले. शांता जिल्हा सामान्य रुग्णालयात येताच डॉक्टरांनी पटापट उपचार सुरू करत रक्त चढवून प्रथम हिमोग्लोबिन वाढवले. करोनाचे उपचार सुरु ठेवत तिचे बाळंतपणही सुखरुप पार पाडले. वास्तविक रुग्णसेवेत व्यग्र असणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला बरे करणे हे एक प्रकारचे कर्तव्यच मानले जाते. मात्र कर्तव्यभावनेपेक्षा त्या रुग्णाप्रति आपुलकीवजा आस्था दाखवण्याचे काम डॉक्टर करत असतील त्यांचे कौतुक व्हायलाच पाहिजे. गेल्या वर्षभरात जवळपास १०१ करोनाबाधित महिलांची बाळंतपणं सुखरूपपणे ठाणे जिल्हा रुग्णालयात पार पडली आहेत. शांतासारख्या अनेक महिलांची सुखरूप सुटका या रुग्णालयाने केली. यात २३ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १०५ नवजात बालकांची सर्वार्थाने काळजी घेतली गेली. यातील सर्वच आज आपापल्या घरी सुखरूप आहेत. करोनाचा काळ हा तसा सर्वांसाठीच कठीण असला तरी ठाणे जिल्ह्यात याचे आव्हान मोठे होते. जिल्ह्यात नऊ महापालिका असूनही आरोग्य यंत्रणा आज अपुरी पडत आहे. त्यातही करोना बाधित गर्भवती महिलांचे बाळंतपण करण्यास करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील मोठ मोठी रुग्णालये धजावत नव्हती तिथे ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची स्थिती काय असेल ती कल्पना आपण करू शकतो. त्यातही दुर्गम आदिवासी तसेच ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे खूपच हाल झाले. अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या आरोग्य विभागाच्या ठाणे जिल्हा रुग्णालयाने आपला रुग्णसेवेचा वसा अगदी चोखपणे जोपासला असेच म्हणावे लागेल. हेच चित्र आरोग्य विभागाच्या राज्यातील बहुतेक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहावयास मिळाले. ह्या कोरोनाकाळात गरोदर महिलांच्या कुटुंबियांची संभ्रमावस्था दूर करत त्या महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करणारे डॉक्टर त्या कुटुंबियांच्या लेखी देवदूतच मानले जातील. 'काही चिंता नको, सर्व ठीक होईल' हे डॉक्टरांचे धीरोदत्त शब्द तुम्हा, आम्हा व रुग्णाला किती ऊर्जा देतात हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.
वैभव मोहन पाटील
Comments
Post a Comment