माणूस मोबाईलचा गुलाम

माणूस मोबाईलचा गुलाम


आजकाल कुठल्‍याही दिवसाची सकाळ ही मोबाईलवर हजारो शुभेच्छा संदेशांनीच सुरू होते. सण असो किंवा एखादे निमित्‍त असो, दरवेळेस संदेशांची देवाणघेवाण करण्‍याचे एकमेव माध्‍यम आज प्रत्‍येकाच्‍या हातात उपलब्‍ध आहे व ते म्‍हणजे मोबाईल. हातोहाती असलेले अँड्रॉईड मोबाईल व त्या प्रत्येक मोबाईलमधील व्हाट्सएप व फेसबुकमुळे देशातील संदेश यंत्रणा भलतीच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा देण्याचा जमानाच गायब झाला आहे. प्रत्येक सणाला व विशिष्ट दिवसाच्या शुभेच्छांसाठी व्हाट्सएप हे एक प्रभावी व सोयीचे माध्यम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे एसएमएस ही बाबदेखील खूप दूर झाली आहे. दररोज मोबाईलवर हजारो संदेश या व्हाट्सएपवर येतात त्यात शुभेच्छा, लेख, उपक्रम, कार्यक्रम, फोटो यांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र इतके संदेश वाचणे व त्यांना प्रतिसाद देणे हे माझ्याच काय कुणाच्याही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे आजकाल रिप्लाय करण्याच्या भानगडीतही कुणी पडेनासा झालाय. सर्वांनाच आता याची सवय झाल्याने प्रतिसादाची कुणी वाटही पाहत नाही व अपेक्षाही ठेवत नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. मात्र यामुळे मने दुरावत चालली आहेत व तंत्रज्ञान जवळ येत चाललेय असे चित्र स्पष्ट दिसत आहे. मोबाईलशिवाय आपल्याला चैनच पडत नाहीय. एकवेळ गप्पा मारायला मित्र वा सोबती नसला तरी चालेल पण चार्ज केलेला व इंटरनेट सुविधा असलेला मोबाईल जवळ असायलाच हवा हा प्रत्येकाने स्वतःलाच घातलेला दंडक झालेला आहे. तंत्रज्ञान नव्हते तेव्हा माणूस माणसाजवळ होता. आता माणूस मोबाईलमध्येच स्वतःची वेगळी नाती शोधू लागलाय. ही प्रगती म्हणायची की माणुसघाणेपण. फावला वेळ हा केवळ मोबाईलवरील मेसेज वाचण्यासाठीच आहे हे आपण बस, रेल्वे, ऑफिस, घर या प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्यांचे निरीक्षण केले तर दिसून येईल. समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट या मोबाईलच्या माध्यमातून शेअर होऊ लागली आहे. अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते निधनाच्या बातमीपर्यंत. त्यात व्हॉट्सअप सारखे एप्लिकेशन तर आणखी खतरनाक ठरू पाहत आहेत. एकतर यात अनेक संदेश पुन्हा पुन्हा फिरत असल्याने ते वाचण्यात नाहक वेळ वाया जातो व दुसरे म्हणजे संपर्काचे सर्वात जवळचे साधन म्हणून आपण याचा अतिरेकी वापर करू लागलेलो आहोत. त्यामुळे अशा एप्लिकेशनवर भविष्यात काही प्रमाणात नियंत्रण हे आणावेच लागणार आहे. माणुसकी व कौटुंबिक नात्यांतील जवळीक हिरावून घेणारे हे तंत्रज्ञान आपुलकी व नातेसंबंध माणसापासून हिरावू पाहत आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे आपण विनाअट मान्य करत असलो तरी माणसातले माणूसपण हिरावणारे हे असले तंत्रज्ञान काय कामाचे !! मोबाईलसंदर्भात पुण्याच्या एनसीसीए या संस्थेने केलेले संधोधन धक्कादायक व धोक्याची घंटा वाजवणारे आहे. ५१५ प्रकारचे जिवाणू व २८ बुरशी मोबाईलवर असतील तर त्याचा वापर करणारे करोडो लोक दररोज त्याभोवती खेळत असताना त्यांचा प्रादुर्भाव लोकांना होत असणार हे गृहीतच आहे. मोबाईलच्या अतिवापराचे धोके अनेक संस्थांनी व तज्ञांनी अधोरेखित केले आहेत. मात्र तरीदेखील मोबाईल आज गरज बनल्यामुळे मोबाईल वापराचे लोकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शरीरावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या मोबाईलला जोवर पर्याय शोधून काढला जात नाही तोवर कितीहि धोके स्पष्ट झाले तरी मोबाईल वापराचे लोकांचे वेड कमी होईल याची सुतराम शक्यता दिसत नाही. वाढते शहरीकरण व तंत्रज्ञानातील जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रत्येक व्यक्ती आज सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल आज घरोघरी, हातोहाती आलेले आहेत. यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचे सर्वात जवळचे माध्यम, प्रत्येकाला मोबाईल हेच वाटते. उच्चशिक्षित तरुणांमध्ये हे फॅड अधिक प्रमाणात पसरले आहे. याच कारणामुळे पुण्यातील एका दाम्पत्याचे आयुष्य संपल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. एमबीए असलेल्या पतीला पत्‍नीचे घरगुती वाद सोशल मीडियावर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करणे रुचले नाही व विवक्षित मानसिकतेतून त्याने पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या पत्नीची जीवनयात्रा संपवली व स्वतादेखील आत्महत्या केली. सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्या नेटिझन्ससाठी हि घटना हादरवणारी असून विचारमंथन करावयास लावणारी आहे. सोशल मीडिया हे आधुनिक तंत्रज्ञानाने आवडी, छंद, कला व उचित गोष्टी सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एक पुरवणी माध्यम असून त्याची सांगड आयुष्यबरोबर घालणे किती धोकादायक आहे हेच पुण्यातील ह्या घटनेतून सिद्ध होते. मोबाईलचे वेड आज मुंबईसारख्या शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणावर पोहोचले आहे. मोबाईल वापराचे हे फॅड माणसांमध्ये इतके भिनले आहे की त्याच्याविना लोकांना अपूर्णतेची जाणीव होऊ लागली आहे. शहरी भागात हे प्रमाण अधिक असण्याचे कारण येथील व्यस्त जनजीवन, मोबाईलच्या किंमतीत झालेली घट व वाढलेला दर्जा, जागोजागी वाय फाय सारख्या सुविधा, मोबाईलद्वारे होत असणारे सुलभ आर्थिक व कार्यालयीन व्यवहार व त्यामुळे वाचणारा वेळ तसेच मोबाइलवर व्हिडिओ पाहण्याचा वाढत असलेला नाद हेच आहे. साहजिकच यामुळे मोबाईलचा अतिवापर होताना दिसत असून घराघरांत, रेल्वे गाड्यांत, बस स्थानकांवर, कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या हातात मोबाईलशिवाय दुसरे काहीच दिसत नसून त्याचा परिणाम लोकांमध्ये मानसिक आजार बळावण्यामध्ये झालेला दिसून येत आहे. यावरुन मोबाईल माणसाच्‍या हातात असला तरी माणूस या मोबाईलचा गुलाम झालेला आहे हेच खरे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त