जलव्यवस्थापन अग्रक्रमाने व्हावे

माणूस एकवेळ पैशाशिवाय जगू शकतो पण पाण्याविना नाही. जल म्हणजे जीवन. निसर्गाकडून मोफत मिळणारे पाणी आज कर भरून विकत घ्यावे लागते. दरवर्षी निसर्ग पावसाच्या रुपात आपल्यावर धो धो बरसत असतो. मात्र या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे बाराही महिने आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. हवा ज्याप्रमाणे संसर्गाला कारणीभूत ठरते त्याच प्रमाणे माणसाला जडणारे बहुतांश आजार हे दूषित पाण्यामुळेदेखील पसरतात हे विसरून चालणार नाही. त्यामुळे शुद्ध पाणी ही माणसाची गरज आहेच पण ते उपलब्ध करणे हे आपले नैतिक कर्तव्यदेखील ठरते. पाणी आडवा पाणी जिरवा,  जलयुक्त शिवार, शेततळी, बंधारे, या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचा सरकारी प्रयत्न होत असला तरी त्याची म्हणावी तितकी पारदर्शक अंमलबजावणी होत नसल्याने त्याची परिणामकारकता कमीच आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर, अपव्यय, दुरुपयोग टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपापल्या परीने पावसाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणेदेखील काळाची गरज आहे. जलसंवर्धनासाठी सरकारी उपाययोजनांना नागरिकांच्या सहयोगाची जोड मिळाली तर पाण्याच्या बाबतीत शहरे व गावे सुजलाम ठरतील. 

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त