ढिसाळ नियोजनाचा परिणाम
- Get link
- X
- Other Apps
गत आठवडयात झालेल्या मुसळधार पावसाने मानवी मर्यादा पुन्हा एकदा अधोरेखीत केल्या. त्याचबरोबर मानव व निसर्ग यांच्यात बिघडत चाललेले संबंधदेखील उघड केले. मानवाने निसर्गावर इतके अतिक्रमण केलेय की एकेकाळी पोटापाण्यासाठी निसर्गावर अवलंबून असणाऱ्या माणसाला आता निसर्गाशी काहीही देणेघेणे नाही अशी परिस्थिती आहे. बिघडलेले ऋतुचक्र निसर्गप्रकोपाची साक्ष देत आहे. अस्ताव्यस्त वाढलेली शहरे, वाढती लोकसंख्या, बळकावलेल्या मोकळ्या जागा, अनधिकृत बांधकामांचे पेव, लुप्त होत चाललेला निसर्ग यामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवतोय जो धोकादायक ठरू लागलाय. उन्हाळा असो व पावसाळा मनुष्यहानी नित्याचीच झालीय. यामध्ये सर्वाधिक पिसला जातोय तो गरीब व मध्यमवर्गीय. उच्चभ्रु लोकांना मात्र या कोपाचा फारसा परिणाम जाणवत नाही हे खरे आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन हे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असून दीर्घकालीन व्यवस्थापन होत नसल्याने त्याचा दरवेळी त्याचा साचेबद्ध विचार केला जातो. त्यातुन ढगफुटी, मुसळधार पाऊस अशी कारणे देऊन पळवाट शोधली जाते. वास्ताविक, नागरी वस्त्यांमधून जाणारे पाणी ओढे, नद्या, नाल्यांतून समुद्रापर्यंत पोहोचवणारी ठोस यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. मात्र त्यामध्ये प्रचंड अडथळे व त्रुटी असल्याकारणाने ह्या ढिसाळ नियोजनाचा पुरता बोजवारा उडत आहे व त्याचा फटका नागरिकांना विशेषतः सखल भागातील लोकांना अधिक प्रमाणात बसत आहे. तसेच ह्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरदेखील शक्य आहे. शहरे ही सुनियोजित असायला हवीत. त्यात असणारी घरे, राहणारी माणसे व येणाऱ्या आपत्ती यांचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होत नसल्याने शहरांचे विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे व वेळीच ते सुधारले नाही तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. सध्याची परिस्थिती त्याची केवळ झलक आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment