कोरोनासह जगणे क्रमप्राप्त
- Get link
- X
- Other Apps
राज्यातील कोरोनाची भीती आता लोकांच्या मनातून बऱ्यापैकी उतरलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी लोक घेऊ लागलेले आहेत. मात्र कोरोनाकाळात घातल्या गेलेल्या निर्बंधांमुळे अनेक व्यावसायीक, उद्योगधंदे, खाजगी नोकरदार वर्ग प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्याची ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत नाही. त्यात निर्बंधदेखील सैल होत नसल्याने लोकांचा संयम ढळू लागलेला आहे. यामुळेच व्यापारी, प्रवाशी आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत निर्बंध उठवून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन सुरळीत करणे आवश्यक आहे. मुंबई ठाण्यातील निर्बंध उठवलेले असले तरी सामान्यांसाठी लोकलसेवा बंद असल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. एकीकडे इंधनाचे वाढणारे दर व त्यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. मुंबईत स्वस्त व जलद वाहतुकीचा पर्याय म्हणून लोकलसेवेकडे पाहिले जाते. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून ही सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने लोक अगदीच मेटाकुटीला आले आहेत. अनेक जण तर दररोज नाईलाजाने विनातिकीट प्रवास करत आहेत त्यात रेल्वेचेदेखील सर्वाधिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्या नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किमान त्यांच्यासाठी तरी लोकलसेवा सुरू करण्यास हरकत नाही. लस घेतलेले लोक कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षित समजले जातात व त्यांचेमार्फत संसर्ग पसरण्याचा धोकादेखील तुलनेने कमी असतो. त्यामुळे अशा लोकांसाठी तरी लोकल उपलब्ध करावी जेणेकरून काम धंद्यासाठी बस, रिक्षा व खाजगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांचा अर्थभार कमी होईल. आगामी सणवार व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर पूर्णतः निर्बंध उठवण्यात अडचणी येत असल्या तरी कोरोना कधी संपेल याची शास्वती सध्यातरी कुणी द्यायला तयार नसल्याने आगामी काळात कोरोनासह जीवन जगणे क्रमप्राप्त आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment