पाण्याखाली गाण्याचा विश्वविक्रम

आपल्यातील अनेकजण आपली कला वृद्धिंगत करण्यासाठी विविध छंद अंगी जोपासतात. या छंदातून मिळणारे आत्मिक समाधान अद्वितीय असल्यामुळे त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र आपल्या अंगी असलेल्या या कलेतून समाजोपयोगी उपक्रमांच्या ध्येयाने पछाडलेले फार कमी कलाकार समाजात आहेत व त्यापैकीच एक म्हणजे गायक विराग मधुमालती. हजारो दृष्टीहीनांना दृष्टी देणाऱ्या पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट साकारणारे विराग आपल्या सामाजिक जीवनात प्रचंड यशस्वी व्यक्तिमत्व आहेत. नेत्रदानाची चळवळ उभ्या महाराष्ट्रात पसरवणाऱ्या विराग यांनी समाजाला दिलेले योगदान नाकारता येणार नाही. नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जास्त नेत्रदान जागरूकता मोहिमा राबवत अनेक वेगवेगळे विश्वविक्रम करत ज्यांनी तब्बल ५ वेळा "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये आपल्या अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. आता तर ते अवयवदानाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत ठळकपणे पोहचावा यासाठी चक्क पाण्याखाली राहून सुरमधुर गाण्यांची (underwater singing) माळ गुंफणार आहेत. हा अद्भुत असा सोहळा भारतात नव्हे तर जगभरात पहिल्यांदाच होत असून हा कार्यक्रम घडवून आणणे देखील त्यांच्यासाठी तितकंच आव्हानात्मक ठरणार आहे. आजवर विश्वविक्रमाचे सर्व कार्यक्रम विराग यांनी जाहीर कार्यक्रमाद्वारे लोकांसमोर सादर केले आहेत. मात्र कोरोना निर्बंधाच्या या काळात हा कार्यक्रम आपल्याला प्रत्यक्षात बघता येणं जरी अवघड असलं तरी हा कार्यक्रम पूर्णतः "ऑनलाईन" होणार असून घरबसल्या संपूर्ण परिवारासमवेत आपल्याला या अद्भुत कार्यक्रमाचे साक्षीदार होणे शक्य होणार आहे. सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम तसेच कॉमेडी किंग सुनील पाल यांचा स्टेज परफॉर्मन्स देखील होणार आहे.  संगीताच्या या अनोख्या कार्यक्रमात विराग यांच्या आरोग्याला धोका असून देखील त्यांनी फक्त अवयवदानाचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या एकाच उद्देशाने ही जोखीम उचलली आहे. आपल्या छातीवर ६० किलो वजन चढवून पाण्याखाली जाणे, पाण्यात गाणे गाताना छातीवरील वजनासहित ताल व सुरानुसार श्वासाचा समतोल राखणे, पाण्यामध्ये मुक्त वावर असलेल्या माश्यांमुळे विचलित न होता सुमधुर गीतांचा परफॉर्मन्स देणे, १-२ मिनिटं नाही तर तब्बल एक तास सतत गाण्याचा आविष्कार अशा बऱ्याच जोखिमा घेत हा विक्रम साकारण्यासाठी विराग सज्ज होत आहेत. हा सोहळा २० नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडणार आहे. अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या या कार्यक्रमाच्या जोरावर विराग मधुमालती आणखी एक नवा आविष्कार "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद करण्यासाठी रचणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल १७ लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ "संगीत का महासागर" या नावाने निर्मित केला जाणार आहे. अशाप्रकारचा ४० फुट उंच म्हणजेच एकंदरीत ४ मजली इमारतीच्या उंचीचा हा संगीतग्रंथ जगात एकमेव असणार यात निश्चितच काही शंका नाही. "संगीत का महासागर" या ग्रंथातील सर्व १७ लाख संगीत अलंकाराचा मजकुर लिहून झाला असून त्याबद्दलची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, विनोदवीर सुनील पाल यांनी या ग्रंथासोबतच या आविष्काराचे जनक विराग यांचे मनभरून कौतुक केले आहे. या नव्या विश्वविक्रमासाठी सन १९९६ पासून रियाझ आणि अलंकारांच्या निर्मितीसाठी अभ्यास ते करत आहे. कलेचे जाणकार विराग मधुमालती यांनी गेली २५ वर्ष कलेसाठी अर्पित केली आहेत आणि इतक्या वर्षांच्या मेहनतीचे यश म्हणजेच हा संगीतग्रंथ आहे असे ते सांगतात. अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले विराग मधुमालती हे नाव केवळ मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी भूषणावह ठरले आहे. सामाजिक उपक्रमांची प्रचंड ओढ असलेले विराग यांना समाजासाठी काहीतरी करण्याच्या इर्षेने पछाडले आहे. पेशाने इंजिनिअर असलेल्या विराग यांनी गेल्या काही वर्षांत विपरीत परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक विश्वविक्रमाँना गवसणी घातली आहे. मग तो चीनचा ४५६ तासांचा सलग गायनाचा विक्रम मोडीत काढून ५५५ तासांचा सलग गायनाचा विक्रम स्थापित केलेला असो की ३०० गायकांच्या सहभागाने रिले पद्धतीने गायलेले चित्रपटगीत असो. सुप्रसिद्ध गायक, निर्माता, दिग्दर्शक, गायन अभिनय प्रशिक्षक या सर्वच पातळ्यांवर ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. नेत्रदान चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दखलपात्र आहे. स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून नेत्रदानाचा संकल्प व आवाहन करताना आम्ही त्यांना पाहिले आहे. अभिनय, गायनाची आवड असलेल्या, हरहून्नरी, समाजासाठी काहितरी करण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना सोबत घेऊन अनेक अनोखे उपक्रम हाती घेणाऱ्या विराग यांची बातच काही और आहे. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळेच ते कायम लक्षात राहतात. मिशन सेव्ह मदर अर्थ म्हणजेच मातृभूमी वाचवण्याच्या मोहिमेचा ध्यास घेतलेला आहे.  पर्यावरणाकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निसर्ग आज वेगाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वाढते शहरीकरण व सिमेंट काँक्रीटच्या जंगलात निसर्ग लुप्त होत आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी. त्यासाठी हातावर मोजणारे पर्यावरण प्रेमी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात आता विराग मधुमालती या नावाचा समावेश झाला आहे. लॉकडाऊन काळात मानवी हस्तक्षेप व क्रिया थांबल्याने या काळामध्ये आपल्याला निसर्गात बरेच सकारात्मक बदल बघावयास मिळाले व सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. यात वायू, ध्वनी, जलप्रदूषण कमालीचे घटल्याने वातावरण निर्मळ झाल्याचे पाहायला मिळाले. अश्यावेळी या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गायक वीराग मधुमालती यांनी निसर्ग वाचवण्यासाठी अनेक संकल्प सोडलेले आहेत त्यात त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटलमध्ये आजन्म पाणी न पिण्याचा संकल्प केलेला आहेत. सन २०११ पासून  पाण्याचे होणारे प्रदुषण टाळण्याकरिता ते गणपती बाप्पाचे विसर्जन करीत नाहीत. विराग मधुमालती यांचा धरती रक्षणाचा हा ध्यास अनेकांना विचारमंथन करण्यास भाग पडणारा आहे. विराग मधुमालती यांचा जीवन व कार्यप्रवास गेल्या काही वर्षांपासून जवळून न्याहाळत असताना त्यांच्या ह्या जगावेगळ्या कार्याबद्दल सर्वांना तोंडओळख व्हावी यासाठीच हा खटाटोप.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त