अमेरिकेची संदिग्धवस्था जबाबदार
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत भयावह बनत चालली आहे. लोकांना सुरक्षेची हमी नसल्याने मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचे आहे. रस्त्यांवर व विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती लोकांनी गर्दी केल्याचे व अशातच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांचा मृत्यू झाल्याचे कधीही न पाहिलेले व्हिडिओदेखील समोर आले आहेत. तालिबानने काबुलवर कब्जा मिळवताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन केले. तालिबानच्या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. वास्तविक अफगाणिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणात होता. अमेरिकेने येथील यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च गेल्या अनेक वर्षांत केला मात्र ऐनवेळी अमेरिकेने आपले सैन्य अफगानमधून हलवण्यास सुरुवात केल्याने तालिबानला विरोध मावळला व त्यांचा अफगाणिस्तानातील मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण अराजकतेला कारणीभूत आहे. त्यामुळे हा अमेरिकेचा सपशेल पराभव आहे. तलिबानने पूर्ण देशावर कब्जा केला, लोक देश सोडून जात आहेत मात्र राष्ट्राध्यक्ष आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळून गेले. वास्तविक हे सर्व एका रात्रीत घडले नाही, तालिबान्यांनी देशातील सर्व प्रांत ताब्यात घेतले आणि अफगाणिस्तान सरकार गप्प राहिले. त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही यावरून अफगानी सैन्याची प्रतिकारशक्ती व मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न न झाल्याने त्यांनी तालिबानपुढे अक्षरशः हात टेकले व देश सरळ तालिबानच्या ताब्यात दिला. वास्तविक तीन लाखांहुन अधिक फौज असलेला अफगाणिस्तान तालिबांचा कडवा प्रतिकार करू शकला असता. मात्र आज अंधकारमय दिसत असलेले भविष्य पाहून तेथील नागरिक विशेषतः महिलांना हाती शस्त्रे घेऊन केविलवाणा विरोध करावा लागत आहे. त्यामुळे या परिस्थितीला अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्ष व अमेरिकेची संदिग्धतावस्थेतील भूमिका जबाबदार आहे. अफगाणिस्तानची अशी अवस्था आज जगातील परावलंबी देशांसाठी धोक्याची घंटा आहे कोणत्याही परिस्थितीत देशाचे स्वातंत्र्य व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठीची.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment