पत्रकार, उद्योजक श्री शरद यशवंत पाटील

वाड्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व - शरद पाटील
गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा अनेक महिन्यांनी पत्रकार, उद्योजक श्री शरद पाटील सरांना भेटण्याचा योग आला. तसे त्यांचे दर्शन रोजच त्यांच्या मशाल चॅनेलवर होते मात्र इच्छा असूनही प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग दुर्मिळच. ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना मी जवळून ओळखत असताना आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, रोखठोक भाषाशैली व डेरिंगबाज पत्रकारिता यामुळे ओळखल्या जाणाऱ्या शरद पाटील यांचा मी कॉलेजजीवनापासून फॅन आहे. अनेक दशके पत्रकारितेत घालवलेल्या शरद पाटील यांनी कधी कुणासमोर हार मानल्याचे मी पाहिलेले नाही. आपल्या स्वतःच्या बुद्धिकौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास बाळगणारे शरद पाटील अत्यंत जिद्दी, निर्भीड, शून्यातून विश्व उभे केलेले आजच्या तरुणांना आदर्शवत असेच आहेत. सन १९९७ साली वाड्याला ज्युनिअर कॉलेजला असताना त्यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केलेले "मशाल" हे मासिक आवर्जून वाचायचो. एकतर त्यावेळी स्थानिक बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांची कमतरता अन दुसरे म्हणजे तो संपूर्ण पेपर एकट्याने लिहून काढलेल्या पत्रकार शरद पाटील यांची निडर भाषा यामुळे मशाल हे वृत्तपत्र संपूर्ण वाडा तालुका व तत्कालीन अवाढव्य अशा ठाणे जिल्ह्यात मोठ्या खपाचे साप्ताहिक म्हणून प्रसिद्ध होते. अनेक राजकारणी, समाजविघातक प्रवृत्ती व औद्योगिक कँपन्यांची दादागिरी शरद पाटील यांनी त्या काळी आपल्या धारदार लेखणीच्या बळावर मोडीत काढली होती. अर्थात याची मोठी किंमतदेखील त्यांना चुकवावी लागली हेदेखील खरेच. अगदी मशाल वृत्तपत्राची होळी, शरद पाटील यांच्याविरुद्ध निषेध रॅल्या आम्ही जवळून पाहिल्या. त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेदेखील झाले. मात्र तरीही न डगमगता आपल्या लेखणीची धार काही त्यांनी कमी होऊ दिली नाही. पत्रकारिता करतानाच असतानाच त्यांनी अनेक उद्योगांमध्ये देखील शिरकाव केला. वाड्यातील नामांकित बिल्डर म्हणूनदेखील त्यांचा मोठा नावलौकिक आहे. तसेच वाड्याजवळील गाळे गावातील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये त्यांनी सुशवी ऍग्रो नावाने उभारलेला शेतीजन्य उत्पादनांचा व्यवसाय आज सर्वाधिक चर्चेत आहे. तालुका, जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, तरुणवर्ग आज या त्यांच्या नव्या व्यवसायास भेट देऊन त्याचे गमक जाणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तेदेखील न थकता, न कंटाळता भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुक्कुटपालन, फुलशेती, फळबागा, भाज्यांची इत्यंभूत माहिती देऊन या जोडधंद्यात यश कसे मिळवायचे याचे धडे देताना सतत दिसतात व त्याचे चित्रणदेखील आपल्या मशाल ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून लक्षावधी लोकांना घडवतात. आजचा तरुणवर्ग शेती उत्पादनांबाबत फारसा जागरूक नाही. अवेळी पाऊस, सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेती करणे आज परवडेनासे झाले आहे. मात्र विपरीत परिस्थितीतुन मार्ग काढत निसर्ग, मेहनत व कौशल्याचा वापर करून शेतीतून पैसा कसा मिळवायचा याचे उत्तम उदाहरण स्वतःच्या कृतीतून शरद पाटील यांनी आज उभे केले आहे. यातून त्यांचे तरुणांना शेतीकडे वळवण्याकडे असलेले उदात्त धोरण अधोरेखित होते. आयुष्यात नाव, पैसा, मानसन्मान सर्व काही स्वकष्टाने मिळवूनदेखील लोकसेवा व समाजहितात व्यग्र असलेल्या शरद पाटलांना न ओळखणारा व्यक्ती पालघर जिल्ह्यात नसेल. आज वाड्यातील अनेक कार्यक्रमांची, दुकानांची, स्पर्धांची उदघाटने त्यांच्या हस्ते संपन्न होतात यातच त्यांची लोकप्रियता दिसून येते.  वृत्तपत्राप्रमाणेच अनेक जाहीर कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून स्थानिक घडामोडींवर आपली भूमिका ते सडेतोड मांडताना दिसतात. त्यामुळेच गावागावातील लोक व विशेष करून तरुणाई त्यांची फॅन आहे. आपल्या लिखाणाने लोकांना 'अस्वस्थ' करणारे शरद पाटील भ्रष्टाचार, रस्ते व सोयीसुविधांची निकृष्ट कामे पाहून स्वतःच प्रचंड अस्वस्थ होतात. त्यांनी आपले वेगळेपण जिल्ह्यात इतकी वर्षे कायमच जपले आहे. पालघर या आदिवासी जिल्ह्यात ठक्कर बाप्पा या आदिवासी गरीब लोकांसाठी असलेल्या शासकीय योजनेत शेकडो कोटींचा झालेला भ्रष्टाचार त्यांनी गतवर्षी चव्हाट्यावर आणला. त्यात अनेक अधिकारी, अभियंते निलंबित देखील झाले. आयआयटी मार्फत झालेल्या चौकशीत तर या योजनेतील भ्रष्ट्राचाराचे पूर्ण पितळच उघडे पडले. यामुळे आदिवासी बांधवांसाठी शासनाने दिलेल्या निधीत कशा प्रकारे अपहार केला जातो हे जिल्ह्यातील लोकांसमोर व महाराष्ट्रासमोर आलेे. भिवंडी वाडा महामार्ग तसेच जिल्ह्यातील अंतर्गत गाव रस्ते यांची झालेली दुर्दशा यावर सध्या ते आवाज उठवत असून या रस्त्यांच्या बांधकामात झालेला अपहार लोकांसमोर आणत आहेत. 'मशाल'च्या आवाजामुळे ह्या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल हा आशावाद रस्त्याच्या दुर्दशेबद्दल त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे बाहेर काढूनही कुणी त्याची उघड वाच्यता करायला तयार नाही ही खंत त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवते. शरद पाटील यांच्याशी माझा परिचय तसा फार जुना. माझी लिखाणाची सवय त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व सुरुवातीच्या काळात लिखाणास प्रसिद्धीमुळेच हळूहळू वाढत गेली. यंदा त्यांच्या घरच्या गणपती दर्शनाच्या निमित्ताने बऱ्याच महिन्यांनी त्यांना भेटण्याचा योग आला. यावेळी कौटुंबिक गोतावळ्यात रमलेले शरद पाटील दिसले. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षण घेत त्यांना व्यवसायात मदत करत आहेत.  शरद पाटील यांची काम करण्याची पद्धत, मित्रमंडळी व गरजूंना मदत करण्याची रीत, त्यांचा पत्रकार ते बिल्डर ते शेती व्यवसायापर्यंतचा यशस्वी प्रवास, सुखासमाधानात सामाजिक जीवन जगत असतानाही पत्रकारितेतून अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी मानसिकता हे सर्वच थक्क करणारे आहे. मित्रमंडळींच्या कायम गोतावळ्यात राहणाऱ्या शरदभाऊंना आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा व यशाचा अजिबात गर्व नाही. सडेतोड लिखाणाने अनेक विरोधक निर्माण झाले असतानाही कोणतीही भीती न बाळगता अगदी सामान्य सामाजिक व प्रापंचिक जीवन व्यतीत करणाऱ्या त्यांच्या स्वभावाविषयी बोलण्यासाठी खरंच शब्द नाहीत. शरद पाटील हे आक्रमक शैलीबरोबरच व्यासंगी लेखक व प्रासंगिक कवी म्हणूनदेखील ओळखले जातात. त्यांची सडेतोड लिखाणाची अनेक पुस्तके आजवर प्रकाशित झालेली आहेत. अनेक कवी संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत. यामुळेच शरद पाटील हे पालघर जिल्ह्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. गणपतीचे दर्शन घेतल्यावर सवयीप्रमाणे त्यांना माझे आरोग्यमंथन व मुलगा विराज याला लोकहितवादी हे पुस्तक भेट देऊन निरोप घेतला. मला भावलेल्या व अनेकांना घडवलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्वाची तोंडओळख आपणा सर्वांना व्हावी एव्हढ्यासाठीच हा खटाटोप.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त