शिक्षण, कला, खेळ व अध्यात्म क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - श्री मोतीराम धाऊ पाटील

क्रिकेट समालोचकापासून ते मार्गदर्शकापर्यंतचा प्रवास 
पराभवाने खचून जाता लढत राहायला शिकवणारा सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळात हार जित झाली तरी खेळाडू जिंकण्याच्या उर्मिनेच खेळतो व आपले सर्व कौशल्य पणाला लावतो. आज गावोगावी, खेडोपाडी क्रिकेटचे महासंग्राम भरवले जातात, त्यातही आता अनेक नवनवे प्रकार सामील झालेत. खेळाने शरीराबरोबर बुद्धीही तल्लख होते असे म्हणतात. त्यामुळेच खेळात यश मिळवणाऱ्या बहुतांश व्यक्ती आपल्या आयुष्यातदेखील यशाला गवसणी घालतात. पालघर जिल्ह्यातील माझे देवघर हे गावदेखील एकेकाळी अष्टपैलू खेळाडू व कलावंतांचा भरणा असलेले गाव म्हणून परिचित होते. प्रत्येकाच्या अंगी असलेले पैलू घडवण्यासाठी एखाद्या शिल्पकाराची गरज भासते व हेच शिल्पकार सध्या दुर्मिळ होऊ पाहत आहेत. मात्र आमच्या गावात जन्मलेल्या एका शिल्पकाराने कलावंत व खेळाडूंची ही गरज ओळखून त्यांच्या गुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्यामुळेच माझ्या लहानपणी मी पाहिलेला तो काळ कायम स्मरणात बसला. 'मोतीराम धाऊ पाटील' उर्फ मोतिभाऊ हे आमच्या गावाला लाभलेले एक रत्नच म्हणावे लागेल. शैक्षणिक, खेळाडू व कलाकारांची पार्श्वभूमी लाभलेल्या त्यांच्या कुटुंबाने गावातील खेळाडू व कलाकारांना पुढे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातूनच गावातील क्रिकेट टीम असो की एखाद्या व्यावसायिक नाटकाला लाजवेल अशी नाट्यकृती बसवणे असो सर्वच पातळ्यांवर गावाचा लौकिक पंचक्रोशीत निर्माण करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. माझ्या लहानपणी गावातील क्रिकेटची टीम, त्यातील प्रत्येक खेळाडूची स्वतःची अशी ओळख व स्पर्धांमधील एक उत्साह यामुळे आमच्या गावातील टीमला सपोर्ट करण्यासाठी आम्ही सगळीकडे जायचो. त्यात मोतिभाऊची कर्णधारशीप व फलंदाजी आमच्या आकर्षणाचे केंद्र असायचे. नंतर अनेक वर्षे ही क्रिकेटची टीम टिकून राहिली व टीममधील ऐक्यदेखील. त्यातूनच गावातील तरुण व ज्येष्ठांना घेऊन रंगमंचावरील नाटके बसवली जायची व शाळेच्या मैदानात सादर व्हायची. यामुळेच गावातील तरुणांचे एका वेगळ्या पातळीवर टीमवर्क दिसून यायचे आणि नाही म्हटले तरी याचे क्रेडिट कुठंतरी मोतिभाऊला जाते. नेतृत्वगुणातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर त्यांनी नंतर शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात खुबीने केला. पेशाने शिक्षक असलेला मोतिभाऊ शहरी शाळांमध्ये शिकवण्यात फार काळ रमला नाही व मिळालेल्या ज्ञानाचा, ओळखिंचा पिटारा घेऊन पुन्हा गावी आला आणि गावातच ज्ञानगंगा आणण्याचा ध्यास त्याने मनी घेतला. त्यामुळेच आज गावात डीएड, बीएड, इंजिनिअरिंग, वकिली शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत ज्यात शिक्षण घेण्यासाठी दूरदूरहुन विद्यार्थी येतात. नर्सिंग, आयटीआय व आणखी इतर पदवीचे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचेदेखील मोतिभाऊच्या बोलण्यातून दिसले. हा व्याप संभाळतानाच राजकीय इच्छाशक्तीतून लोकसेवेत राहण्याची तळमळदेखील त्यांच्यात प्रकर्षांने दिसून येते. यामुळेच शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा खटाटोपदेखील त्यांनी एकवेळ केला. सामाजिक कार्याच्या आवडीतुन त्यांची पत्नी चित्रा उर्फ माई हीदेखील आज गावातील ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून ग्रामसुधारणेत व्यस्त आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत माई व मी एकत्र शिकलेलो असल्यामुळे वर्गमैत्रिणीचा एक महिला म्हणून सामाजिक बांधिलकीचा हा ध्यास पाहून नक्कीच अभिमान वाटतो. असो, काल त्यांच्या घरातील गौराई मातेच्या दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाण्याचा योग आला व गप्पांचा फड तिथेच रंगला. सवयीप्रमाणे भाऊंना म्हैसूरचा वाघ व माईला स्वराज्याचे प्रतिशिवाजी हे पुस्तक भेट दिले. गावसुधारणेच्या अनुषंगाने या दाम्पत्याचा असलेला दृष्टिकोन समाजाला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. क्रिकेट सामन्यांच्या समालोचनापासून सुरू झालेला मोतिभाऊंचा प्रवास आज प्रबोधक व मार्गदर्शकापर्यंत येऊन ठेपलाय ज्याचा लाभ अधिकाधिक तरुणांना मिळावा असे मनोमन वाटते. त्यांच्या हातांना बळ मिळायलाच हवे. शिक्षण, खेळ, ग्रामविकास, कला किंवा अध्यात्म या सर्वच क्षेत्रांत हेवा वाटण्याजोगे कार्य करत असलेल्या मोतीभाऊ व माईला भविष्यात अपेक्षानुरूप यश मिळो हीच सदिच्छा.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा