पोलिसांचा धाक व विश्वासार्हता वाढणे गरजेची
मुंबईतील साकीनाका घटनेनंतर डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर घडलेली बलात्काराची घटना अत्यंत चीड आणणारी आहे. सातत्याने उघडकीस येत असलेल्या बलात्काराच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मुंबई महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तब्बल तीस जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिने तिला ब्लॅकमेल करत बलात्कार केला व ही घटना पोलीस यंत्रणांपर्यंत पोहोचली नाही हे खरोखरच दुर्दैव आहे. आजच्या २१व्या शतकातदेखील अशा प्रकारच्या घटना सरेआम घडत असतील तर त्यासाठी मोठ्या आत्मचिंतानाची गरज आहे. नराधमांना पोलिसांचे व कायद्याचे भय राहिले नसल्याने त्यांची हिंमत बळावत चालली आहे. पैसा व राजकीय वजन वापरून कितीही मोठा गुन्हा केला तरी सुटता येते हा समाजात दृढ होत चाललेले भ्रम दूर करण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आलेली आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना ताबडतोब कठोरातील कठोर नव्हे फाशीचीच शिक्षा सुनावली गेली पाहिजे. यासाठी पोलीस व न्यायव्यवस्थेने असे खटले अधिक न लांबवता त्यावर तातडीने सुनावणी घेतली पाहिजे. आरोपींना पाठीशी घालणारा दबाव झुगारून त्यांना तातडीने कडक सजा दिली तर समाजविघातक वृत्तींची हिंमत वेळीच चेचली जाईल व पुन्हा असे गुन्हे घडणार नाहीत. बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांनी तत्परता दाखवत वेळीच तपास व गुन्हे दाखल केले पाहिजेत. यासाठी पीडितांना बळ देण्याची गरज आहे. अन्याय अत्याचारविरुद्ध महिलांनी सहनशीलता न दाखवता वेळीच कायद्याचा आधार घेतला तर अशा घटना रोखता येतील. यासाठी पोलीस यंत्रणा व नागरिकांमध्ये सुसंवाद आवश्यक आहे. पोलिसांबद्दल वाटणारी विश्वासार्हताच अशा गुन्ह्यांना वेळेत उघड करण्यास सहाय्यभूत ठरेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment