मुजोर फेरीवाल्यांना पायबंद हवा

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी झालेला भीषण हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. फेरीवाला हटवण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने केलेल्या ह्या जीवघेण्या चाकू हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटली आहेत. फेरीवाल्यांची अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याइतपत हिंमत होतेच कशी असा प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षांपासून ठाणे परिसरात फेरीवाल्यांचे प्रमाण आणि मुजोरीही वाढली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही मुजोरी रोखण्यासाठी पोलीस अथवा पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांची हिंमत वाढली आहे व आज ठाणे शहराच्या सर्वच भागांत या फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत बस्तान बसवले आहे. पिंपळे यांच्यासारख्या प्रमाणिकतेने आपले कर्तव्य बजावत असलेल्या महिला अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने फेरीवाल्यांकडून जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार घडत असतील तर यापुढे अधिकारी तरी जीव धोक्यात घालून कारवाईसाठी जातील का हा एक प्रश्नच आहे. ठाण्यासारखाय हायटेक स्मार्ट सिटीत फेरीवाल्यांची ही उग्र व भीषण समस्या शहराच्या सौंदर्याला गालबोट लावणारी आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कल्पिता पिंपळे यांनी माध्यमांसमोर फेरीवाल्यांना न भिता कर्तव्य बाजावतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी त्यांना व इतर अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनीदेखील तितकीच तत्परता दाखवली पाहिजे. फेरीवाले व पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप अनेक महानगरपालिकांमध्ये सातत्याने होतो. तक्रारी आल्यावर थातूर मातूर कारवाई करण्याचे नाटक केले जाते व दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी गत महानगरपालिकांतील फेरीवाल्यांची आहे. आजवर ठोस असे फेरीवाला धोरण आखले गेले नसल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांना व माफियांना रान मोकळे मिळत आहे. यात हप्ते, खंडणी, मक्तेदारी, दादागिरी, मारहाण आलीच. ठाण्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच महानगरपालिकांनी ह्या मुजोर, बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त