सारे काही टीआरपिसाठी
अंमली पदार्थ सेवन प्रकरणात पार्टी सुरू असलेल्या क्रूझ वरून अनेकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. मात्र यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सहभागी होता म्हणून या प्रकरणाला माध्यमांनी प्रचंड उचलून धरले. अगदी कस्टडीत असताना त्याने काय खाल्ले, काय नाही इथपर्यंत चर्चा रंगल्या. एशोआरामात जीवन जगणारे बॉलिवूड कलाकार, त्यांची मुले यांच्यासाठी ड्रग्स व इतर अंमली पदार्थांच्या पार्ट्या नव्या नाहीत. मात्र पकडला तो चोर अशी समजूत त्यांच्या बाबतीत खरी ठरते. अशा लोकांना दीर्घकाळ जेलची हवा देऊन मोठी शिक्षा व्हायला हवी. मात्र ग्लॅमर दुनियेतील व्यक्ती म्हणून स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी माध्यमे त्यांना लाईव्ह कव्हरेज देतात. कालांतराने अशा व्यक्ती जेलमधून सुटून बाहेर येतात व पुन्हा आपले रेड कार्पेटवरील जीवन एशोआरामात जगतात. महाराष्ट्रात आज अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. दाहक बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या व्यथा, महागाई, महिलांवरील रोजचे अत्याचार अशा घटना लोकांसमोर आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सोडून दिवसभर या गुन्हेगार नटांच्या व त्यांच्या मुलांच्या मागे फिरून प्रसारमाध्यमे काय साधतात हे कळायला मार्ग नाही. बरं या कलाकारांचा समाजाला कितपत फायदा होतो तर त्याचे उत्तरही काही अपवाद वगळता शून्यच आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या ह्या झगमगत्या व अंमली दुनियेपासून महाराष्ट्रातील मराठी प्रसारमाध्यमांनी तरी चार हात दूरच राहावे व राज्यातील प्रश्नांना वाचा फोडावी असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment