समाजभान जोपासणारे 'सूचक' व्यक्तिमत्त्व - श्री के टी पाटील
समाजकार्याचा ध्यास घेतलेले के टी पाटील
आपल्यातील अनेकांना आपले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करता करता समाजभान जोपासत समाजातील अडलेल्या नडलेल्यांसाठी यथाशक्ती काहीतरी मदत करण्याचा ध्यास असतो. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रसंगी पदरमोड करत स्वकमाईतून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करताना अनेक जण आपल्याला अवतीभोवती दिसतात. ह्याच ऋणानुबंधातून होणारी मदत अनेकांचे जीवन घडवणारी ठरत असते. त्यामुळे असे लोक जे आपल्या प्रापंचिक, व्यवसायिक जीवनातून वेळ काढत गरजूंना वेळप्रसंगी मदत करतात त्यांचा मला नेहमीच अभिमान वाटतो. अशा व्यक्ती खरे तर नाव, प्रसिद्धीसाठी सामाजिक जीवनात कधीच नसतात, मात्र त्यांचे समजासाठीचे योगदान व उदारतावादी दृष्टिकोन दुर्लक्षित करून चालणार नाही. श्री काशीनाथ पाटील उर्फ के टी पाटील हे सामाजिक कार्याच्या ध्यासाने व्यापलेले असेच एक व्यक्तिमत्व. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डोंगस्ते या गावचे सुपुत्र असलेले के टी पाटील यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने व इच्छाशक्तीने आपला व्यावसायिक डोलारा उभा केला आहे. सुरुवातीला एलआयसीमध्ये काम करत असताना त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला. त्यातून अनेक प्रतिष्ठित लोक, नेते, पुढारी, सरकारी अधिकारी व गावागावातील लोकांशी त्यांचे सौह्रदपूर्ण सबंध प्रस्थापित झाले. गेल्या काही वर्षांपासून ते हॉटेल व्यवसायामध्ये स्थायिक झाले असून कुडूस या नाक्याच्या ठिकाणी त्यांची 'सूचक' या नावाने दोन हॉटेल्स कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या व्यवसायात त्यांची पत्नीदेखील त्यांना सढळ हस्ते साथ देत असल्यामुळे ह्या दोघा दाम्पत्याच्या मेहनतीवर त्यांचा व्यवसाय चांगलाच बहरल्याचे पाहायला मिळते. शहरामधील हॉटेल्सच्या सोयीसुविधा त्यादेखील घरगुती चविसह ग्रामीण भागातील लोकांना मिळाव्यात ह्या उद्देशाने त्यांनी नव्याने सुरू केलेले 'सूचक' त्यांच्या कौशल्यावजा नियोजनाची चुणूक दाखवते. चव, गुणवत्ता व पदार्थांमधील विविधता एकदा 'सूचक' चा आस्वाद घेतल्याशिवाय कळायची नाही. विनम्र, हसतमुख, आदरयुक्त अशा लक्षात राहणाऱ्या स्वभावामुळे त्यांचा व्यवसाय व संपर्कदेखील मोठया प्रमाणावर वाढला आहे. माणसे जोडायचा त्यांचा गुण विशेषत्वाने लक्षात राहतो. व्यवसायाचा इतका मोठा व्याप असतानादेखील लोकांना मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावात जरादेखील बदल झालेला नाही. कुणाचे आजारपण असो, तातडीने रुग्णालयात दाखल करणे असो, कुणाला एखाद्या मदतीची गरज असो, सरकारी कार्यालयात कुणाचे काम अडलेले असो सर्वच बाबतीत ते इतरांच्या मदतीला आवर्जून धावून जातात. कोरोना काळात स्वतःला कोरोनाने जखडल्यानंतरदेखील त्यांनी अनेकांचे जीव वाचवण्याचा व त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याच स्वभावातून सामाजिक जबाबदारी जोपाण्याचा प्रयत्न ते नेहमीच करतात. आमच्या देवघर गावात आयोजित बालसंस्कार शिबिरात मुलांसाठी काही न काही मदत करताना ते दरवर्षी दिसतात. नुकतेच देवघर केंद्रातील डोंगस्ते, पष्टेपाडा, काचरेपाडा या शाळांतील ८० विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून तसेच मुलांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून साबण, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश या साहित्यासोबत दिवाळी अभ्यास करण्यासाठी दुरेघी, चाररेघी वह्या व पेन असे साहित्य भेट म्हणून दिले. याच कार्यक्रमात त्यांनी मुलांची पाढे पाठांतर स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसेही दिली. या वेळी त्यांनी उपस्थित पालकांना इंग्रजी माध्यमातून आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केल्याबद्दल धन्यवाद दिले व मुलाना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासाठी शिक्षक वृंदास सहकार्य करण्याचे आवाहन केले. स्वतःच्या कामातून वेळ काढून दुसऱ्यांना शक्य तितकी मदत करणाऱ्यांची संख्या आजच्या काळात नगण्य होत चाललीय. प्रापंचिक जबाबदऱ्यांमध्ये आपण इतके व्यस्त असतो की समाजातील गरजू, दुर्बल घटकांपर्यंत अजूनही किमान गरजेच्या वस्तू पोहोचत नाहीत ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे सधन लोकांनी इतरांना जमेल तितकी मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच जे लोक असा प्रयत्न करतात त्यांचे खच्चीकरण न करता त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. के टी पाटील या आपल्या वेगळेपणामुळे मला भावलेल्या व्यक्तिमत्वाची तोंडओळख आपणा सर्वांना व्हावी यासाठी हा लेखप्रपंच. त्यांच्या व्यवसायास व सामाजिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा. वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment