एसटी दरवाढ कमी व्हायला हवी

एसटी हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार असे अनेक घटक स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून एसटी वर अवलंबून आहेत. सरकारमार्फत चालवण्यात येणारी परिवहन व्यवस्था यामुळे ती सर्वसामान्यांना परवडणारीच असावी असे धोरण या सेवेचे असायला हवे. लालपरी नावाने ओळखली जाणारी ही एसटी ग्रामीण व शहरी भागाला जोडणारी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र विविध कारणांनी सातत्याने एसटीची भाववाढ केली जात आहे. नुकतीच एसटी भाड्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ करत महागाईने आधीच पिचलेल्या सर्वसामान्यांना सरकारने मोठा दणका दिला आहे. दररोजचे वाढत चाललेले इंधन दर व त्यामुळे खाजगी वाहनांचा वाढलेल्या प्रवास खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक वाहतुकीला बळ देऊन लोकांना दिलासा द्यायला हवा. एसटी सारख्या तळागाळात, खेडोपाडी पोहोचलेल्या परिवहन सेवेचे बळकटीकरण व अत्याधुनिकीकरण करायला हवे. मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये एसटी ची परिस्थिती जैसे थे आहे. त्यात आता सततची भाववाढ होत असल्याने सामान्य लोकांनी प्रवास करायचा तरी कशाने असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंधन दरवाढ हे कारण एसटीच्या दरवाढीला देण्यात येत असले तरी ह्या राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना सवलतीच्या व करमुक्त दराने इंधन उपलब्ध करता येईल का याचे पर्यायदेखील पडताळून पाहायला हवेत. एसटीची भाववाढ रोखण्यासाठी सरकारी प्रयत्न सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरतील मात्र त्यासाठी सरकारी मानसिकता बदलायला हवी. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त