तोंडावरून मास्क उतरू देऊ नका

कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असल्याने सरकारने सार्वजनिक स्थळे व गर्दीवरील बंधने हळूहळू सैल करायला लावली आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वाधिक कामी आलेला घटक म्हणजे मास्कदेखील लोकांच्या तोंडावरून उतरू लागला आहे ही चिंतेची बाब आहे. आज सर्वच सार्वजनिक स्थळे व प्रवासामध्ये बहुतांश लोक विना मास्क किंवा मास्क हनुवटीवर लावून फिरताना दिसतात. लोकल ट्रेन, बससारख्या गर्दीच्या ठिकाणांवर देखील हीच परिस्थिती आहे. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होणे ही चांगली बाब आहे मात्र मास्क परिधान न करून इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्यांवर अंकुश ठेवायलाच हवा. अनेक जण कोरोना संपला या अविर्भावात मास्कला फाटा देत सर्वत्र बागडताना दिसतात. हा अतिआत्मविश्वास इतरांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो हा सुतराम विचार त्यांच्या डोक्यात नसतो. बरं त्यांना सध्या काही बोलायचीही सोय राहिलेली नाही, कारण तसे केल्यास तो उद्धटपणा किंवा सांगणाऱ्याची अतिशिष्टाई ठरते. विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध महापालिकांची कारवाईदेखील थंडावल्याने अशा बहाद्दरांचे चांगलेच फावते व ते मोठ्या ऐटीत मास्क काढून वा मास्क नाका तोंडाखाली उतरवून प्रवास करताना दिसतात. कोरोनाची दुसरी लाट याच फाजील अतिआत्मविश्वासाने पसरलेली असल्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकांच्या तोंडावरील मास्क उतरू न देण्याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 


Comments