जागरूक सुशिक्षित नागरिकांचे योगदान महत्वाचे
नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील सर्वात नियोजनबद्ध शहर आहे. सिडकोने निर्माण केलेल्या ह्या शहराच्या सुंदरतेवर महानगरपालिकेने कळस चढवला. कोणत्याही शहराचा विकास साचेबद्ध पद्धतीने केला की ते शहर बकालतेकडे जात नाही. अनधिकृत बांधकामे शहराच्या अनियंत्रित लोकसंख्यावाढीला कारणीभूत ठरतात व हीच वाढती लोकसंख्या शहरे विद्रुप करण्याचे कारण बनते. नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे जे अत्यंत नियोजनात्मक पद्धतीने तयार करण्यात आले आहे व आजवर ही नियोजनबद्धता टिकवूनदेखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नोड, सेक्टर, इमारती, मजले, घरे व त्यात वास्तव्य करणारे कमाल नागरिक हे ठराविक संख्येने अस्तित्वात आहेत ज्यात नव्याने वाढ नजीकच्या काळात संभवत नाही. अशा नियंत्रित शहरात स्वच्छतेसारख्या नागरी सुविधा पुरवणे पुरवणे सहजसाध्य होऊन जाते. यात नागरिकांचादेखील सक्रिय सहभाग अत्यंत मौलिक असतो जो नवी मुंबईत वेळोवेळी मिळत आलेला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईला सातत्याने मिळत असलेल्या पुरस्कारांसाठी शहराची नियोजनबद्धता, स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्यतत्परता व जागरूक-सुशिक्षित नागरिकांचे योगदान ह्या बाबी कारणीभूत आहेत. या बाबी आजूबाजूच्या इतर शहरांमध्ये अपवादानेच आढळतात. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारखी शहरे अस्ताव्यस्तपणे वाढत असून त्या प्रमाणात वाढत्या नागरिकीकरणाला सोयीसुविधा पुरवणे महानगरपालिकांना जिकिरीचे ठरत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment