मुंबईला स्वच्छतेचे वावडे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोणत्याही शहराचा विकास साचेबद्ध पद्धतीने केला की ते शहर बकालतेकडे जात नाही. अनधिकृत बांधकामे शहराच्या अनियंत्रित लोकसंख्यावाढीला कारणीभूत ठरतात व हीच वाढती लोकसंख्या शहरे विद्रुप करण्याचे कारण बनते. शहर सुंदर बनण्यासाठी ते स्वच्छ असावे लागते. स्वच्छता हा कुठल्याही शहराचा लौकिक व सन्मान वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. नवी मुंबई, पनवेल यासारख्या शेजारच्या महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत भरारी घेत असताना मुंबई शहरात मात्र स्वच्छतेचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. जागोजागी, गल्लोगल्ली, रस्त्यांवर कचऱ्याचे प्रमाण शहराच्या दुर्दशेचे कारण बनत आहे. मुंबई शहर गेल्या काही वर्षांमध्ये अस्ताव्यस्तपणे वाढलेले आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराच्या लोकसंख्येतदेखील भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने आज मुंबईची अवस्था विस्फोटक स्वरूपात आहे. नागरी सुविधांबरोबरच स्वच्छतेच्या बाबतीतदेखील मुंबई मागे राहिली आहे. वास्तविक देशाची आर्थिक राजधानी असलेल्या ह्या शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवा. रोज नव्याने होणारी इमारतींची बांधकामे, अनधिकृत वस्त्या, येथे मोठ्या संख्येने होत असलेले स्थलांतर, ऐकापेक्षा अधिक प्राधिकरणांचा वावर व प्रशासनिक उदासीनता यामुळे मुंबईचे रूप आज बकालतेकडे झुकत चालले आहे. यासाठी या शहराच्या सुंदरतेचा नव्याने विचार करण्यासाठी सिडको सारखी एखादी संस्था कार्यान्वित करणे तसेच मुंबईच्या दिशेने देशभरातून दररोज येणारे लोंढे थोपवणे गरजेचे झाले आहे. शहरातील मुख्यालये व कार्यालये उपनगरांकडे सरकवण्याचादेखील विचारदेखील करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिकेने याबाबतीत पुढाकार घेऊन सरकारला प्रस्ताव देणे इष्ट ठरेल. नियंत्रित शहरात स्वच्छतेसारख्या नागरी सुविधा पुरवणे पुरवणे सहजसाध्य होऊन जाते. यात नागरिकांचादेखील सक्रिय सहभाग अत्यंत मौलिक आहे. अस्ताव्यस्तपणे वाढत चाललेल्या मुंबई शहराला सोयीसुविधा पुरवणे महानगरपालिकेला जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबत मुंबईला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनीक नियोजन, राजकीय मानसिकता व सर्वसामावेशक धोरण ह्या बाबी क्रमप्राप्त ठरतात. वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment