संवेदनशील व कवी मनाचा सेवाव्रती - डॉ कैलास जवादे

सेवाव्रती डॉक्टर
पद्मश्री डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या सर्जरी विभागाचे प्राध्यापक, अवयवप्रत्यारोपन विभागाचे प्रमुख व डी वाय रुग्णालयाचे अनुभवी सर्जन डॉ कैलास जवादे यांच्याशी माझा संपर्क अगदी अलिकडला. दोन वर्षांपूर्वी आजीच्या गाठीचे ऑपरेशन नेरूळच्या डी वाय पाटील रुग्णालयात त्यांनी केल्यानंतर त्यांच्याशी आलेला संपर्क उत्तरोत्तर वाढत गेला आणि डॉ जवादे हे केवळ एक निष्णात सर्जन नसून अनेक कलागुण अंगी बाळगणारे आसामी आहेत हे हळूहळू लक्षात आले. शस्त्रक्रिया क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि आपल्या नेतृत्व कौशल्यावर त्यांनी डी वाय पाटील रुग्णालयात आपल्या डॉक्टरांची एक उत्तम टीम तयार केली आहे ज्याच्या बळावर रुग्णालयाचा नावलौकिक वाढवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. यामुळेच रुग्णालयातील अवयवप्रत्यारोपन विभागाचे प्रमुख म्हणूनही ते काम पाहत आहेत. अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ जवादे यांचे वर्तन व राहणीमान अत्यंत साधे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे एमबीबीएस, अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात एमएस सर्जरीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ जवादे सरांनी तैवान येथून यकृत म्हणजे लिव्हर प्रत्यारोपणाची फेलोशिपदेखील घेतली आहे. सहकारी व रुग्णाप्रती आत्यंतिक स्नेहभाव बाळगणारे डॉ जवादे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. रुग्णसेवा करताना सामाजिक कार्याची जोड देण्याचा देखील त्यांचा सतत प्रयत्न असतो. यातूनच अनेक शासकीय वैद्यकीय शिबिरांतून त्यांनी सेवा दिलेली आहे. आज शासनाच्या अवयवप्रत्यारोपन कायद्यांतर्गत गठीत करण्यात आलेल्या सल्लागार समितीतदेखील त्यांचा समावेश आहे. याच समितीच्या एका बैठकीसाठी आले असता मागील सोमवारी त्यांची कार्यालयात भेट झाली. यावेळी कार्यालयातील अवयवप्रत्यारोपन विभागाचे डॉ अरुण यादव यांच्यासोबत अनेक विषयांवर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. सवयीप्रमाणे त्यांना माझे आरोग्यमंथन हे पुस्तकदेखील भेट दिले. अवयवप्रत्यारोपणासारख्या अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळयाच्या विषयावर त्यांचा अत्यंत दांडगा अभ्यास असून त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांच्या कल्पना मनाला पटतात. जन्मतः किंवा अपघाताने विविध अवयव निकामी झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना इतरांचे अवयव मरणोत्तर उपलब्ध होणेसाठी अवयवदानाच्या प्रक्रियेची जनजागृती मोठया प्रमाणावर होणे आवश्यक आहे ज्यायोगे अवयव दात्यांची संख्या वाढली पाहिजे असे मत ते व्यक्त करतात. 'पंढरपूरची वारी' ही अवयवदानाची संकल्पना राबवण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून वारीमध्ये हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल असे त्यांचे मत आहे. त्यांची विठुमाऊलीवर निस्सीम श्रद्धा असून वारीचे गुणगान त्यांच्या तोंडी सतत ऐकायला मिळते. डॉ जवादे हे एक उत्तम लेखक व कवी असून त्यांच्या अनेक शीघ्रकविता सोशल माध्यमांवर वाचायला मिळतात. शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या योजनेमार्फत विविध क्षेत्रात कौशल्यधारीत शिक्षण तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी एखाद्या संस्थेची निर्मिती करण्याचीदेखील त्यांची इच्छा आहे. अश्या ह्या अष्टपैलुत्व धारण केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील एका वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिणे न राहवल्याने हा लेखप्रपंच. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

  1. Thank you very much for writing a blog on me. It is love, inspiration and well wishes from friends like you which help me to do some work and contribution for society. Thank you!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त