पुस्तकभेटीत मिळणारा आनंद अवर्णनीय
वाचनसंपदा समृद्ध करणारी भेट
ठाण्यात राहणारी बहीण दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनासाठी घरी येणार होती. नेहमीची ओवाळणी, भेट वस्तू याव्यतिरिक्त काहीतरी विशेष भेट द्यावी असा विचार मी करत होतो. तेव्हा नजर घरातील माझ्या पुस्तक संचयाकडे गेली. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे कुठेही गेलो तरी नवनवीन पुस्तक खरेदीकडे माझा अधिक कल असतो. त्यामुळे अशा अनेक पुस्तकांचा संचय घरी झालेला आहे. मग कुणाचा वाढदिवस, लग्न, सेवानिवृत्ती असली की ही पुस्तके आवर्जून मी त्या व्यक्तीला भेट देत असतो. बहीण नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेवर शिक्षिका आहे. तिच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक परिचयाचे असल्यामुळे अधूनमधून विविध माध्यमातून त्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे विचार केला की बहीण घरी आली की तिला तिच्या शाळेसाठी काही पुस्तके भेट करायची जेणेकरून ती पुस्तके शाळेतील लायब्ररीत जमा होतील व मुलांची वाचनसंपदा वृद्धिंगत होण्यासाठी कामी येतील. त्यामुळे आदल्याच दिवशी संग्रहातील काही बोधपर पुस्तके काढून पिशवीत बांधून ठेवली. रक्षाबंधनाला बहीण घरी आली. मोठ्यांचा व लहानग्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यावर सदर पुस्तके शाळेसाठी बहिणीच्या हातात सोपवली. तिलादेखील ही अनपेक्षित व अनोखी भेट पाहून आनंदच झाला. कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यानंतर तिने ती पुस्तके भावाची भेट म्हणून शाळेतील मुख्याध्यापकांना सोपवली व त्याचे फोटो आवर्जून मला पाठवले. यानंतर शाळेतील काही शिक्षकांनीदेखील मला मोबाईल संदेश करून धन्यवाद दिले. खरेतर कुठल्याही प्रसंगात भेट देण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरी चांगली गोष्ट असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा तेव्हा पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्याचा माझा नेहमीच अट्टाहास असतो. यावेळी थेट रक्षाबंधनालाच ही संधी साधत मी माझा हट्ट व बहिणीच्या शाळेतील मुलांची वाचनाची गरज पूर्ण केली याचा विशेष हर्ष आहे. वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment