जलवाहतूक नोकरदारांच्या उपयोगाची हवी
बेलापूर ते भाऊच्या धक्क्यापर्यंत १६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या जलवाहतुकीचा फायदा नक्की कुणाला होणार हे सर्वस्वी या प्रवासाचे तिकीट दर, वेळ व स्थानिकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आज नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने प्रवास करणारा वर्ग बहुतांश नोकरदार आहे. रेल्वे अथवा बसने प्रवास करणे किफायतशीर असल्याने या दोन मार्गाने प्रवासाकडेच त्यांचा अधिक ओढा आहे. बस अथवा रेल्वे प्रवासभाड्याइतकी जलवाहतूक स्वस्त मिळेल अशी शक्यता सध्यातरी नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू झालेल्या व हार्बर मार्गावर सुरू होत असलेल्या एसी लोकलची जी अवस्था आहे तीच अवस्था या जलवाहतुकीची होऊ नये. आज सामान्य लोकल खचाखच तर एसी लोकल पूर्णपणे रिकाम्या धावताना दिसत आहेत. यावरून या मार्गांवरून प्रवास मरणारे श्रीमंत नसून सर्वसामान्य चाकरमानी आहेत लक्षात घ्यायला हवे. जलवाहतुकीचा लाभ नवी मुंबईच्या बेलापूर व आसपासच्या नोडमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांना मिळणार असला तरी त्याचे तिकीट दर किती असतील यावर तेथील प्रवाशी संख्या अवलंबून असेल एव्हढे नक्की. रेल्वे वा बसने साधारणतः वीस रुपयांमध्ये मुंबईकडे प्रवास होतो. जलवाहतुकीचे दर पन्नास रुपयांच्या घरात असले तरीही गड्या आपली ट्रेन किंवा बसच बरी अशी भावना प्रवाशांची असेल. त्यामुळे तिकीट दर ठरवताना नवी मुंबईतील सर्वसामान्य नोकरदारांचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा रेल्वे व रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सुरू होणारी ही नवी वॉटर टॅक्सी केवळ पर्यटनाचे केंद्र बनून राहील .
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment