लढवय्या अधिकाऱ्याचे अपघाती निधन चटका लावणारे

तामिळनाडूत कुन्नूर येथे कोसळलेल्या हवाईदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सिडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी व अन्य ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय संरक्षण दलासह देशासाठी ही अत्यंत धक्कादायक घटना असून सर्व स्तरांतून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख पद भूषवणाऱ्या एका अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने झालेला मृत्यू हवाईदलाच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. हवाईदलाची विमाने व हेलिकॉप्टर ही तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कुठल्याही आपात परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरबाबत अशा प्रकारचा अपघात दुर्दैवी आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली कारगील युद्धानंतर   आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने केलेल्या शिफारशीवरून संरक्षण दलात चिफ ऑफ डिफेंस स्टाफ सिडीएस या पदाची निर्मिती केली गेली. मोठ्या आपत्कालिन परिस्थितीत किंवा देशाच्या संरक्षणासाठी लष्कर, वायूदल, नौदल या तिन्ही दलांमध्ये समन्वय राहावा यासाठी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली. हे पद निर्माण करण्यासाठी 20 वर्षे वाट पाहावी लागली. ४ स्टार रॅंकिंगचं  हे पद आहे. डिसेंबर 2019 देशाचे पहिले सीडीएस म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तान, चीन आणि ईशान्य भारताच्या सीमेवरील जबाबदारी सांभाळलेली होती. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारतीय सीमांवरून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी तसेच सैन्याचे मनोबल वाढण्यासाठी मोठी मदत झाली. अशा एका लढवय्या व देशाच्या संरक्षणात मौलिक भूमिका निभावलेल्या अधिकाऱ्याचे अपघाती निधन मनाला चटका लावून गेले. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त