अवयवदानात पुन्हा महाराष्ट्र अग्रेसर
"अवयवदान श्रेष्ठ दान"
अवयवदानामध्ये सर्वात अग्रेसर राज्य म्हणून केंद्र शासनातर्फे नुकताच नवी दिल्ली १२व्या भारतीय अवयवदान दिनाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. यामध्ये अवयावदानात सर्वोकृष्ठ कामगिरी करणारे राज्य म्हणून राज्य महाराष्ट्राचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरात एकूण ८८ दात्यांनी मृत्यूपश्चात २४४ अवयवांचे दान केले. यासाठी महाराष्ट्रात जनजागृतीसाठी राज्यभर कार्यक्रम राबविण्यात आले. राज्यात अवयवदानाची चळवळीचे हे मोठे यश असुन केंद्र शासनाकडून सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकांने पुरस्कृत होणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. कोरोना काळातदेखील महाराष्ट्राने अवयवदानात केलेली ही कामगिरी दैदिप्यमान अशीच आहे. खरेतर याचे संपूर्ण श्रेय सर्व अवयवदाते व त्यांचे कुटुंबिय ज्यांनी मृत नातेवाईकांच्या अवयवदानाचा धाडसी व स्तुत्य निर्णय घेतला त्यांचे असुन अवयवदान चळवळीत काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्था, प्रत्यारोपन करणारी शासकीय व खाजगी रुग्णालये, तज्ञ डॉक्टर, तसेच राज्यस्तरीय आरोग्य व्यवस्थेचेदेखील आहे. अवयवदानाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात परोपकाराची भावना लोकांच्या मनात तग धरून असल्याचे दिसुन येत आहे. कोरोना काळात आरोग्यव्यवस्था आणि वैदयकीय क्षेत्रावर सर्वाधिक ताण पडल्यामुळे लॉकडाऊन काळात अवयवदानाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात अवयवदानाची आकडेवारी खूप कमी आहे. खूपच कमी लोक अवयवदानासाठी पुढे येत आहेत. अवयवांची गरज मात्र मोठी आहे. यामुळे अनेक लोक विविध अवयवांच्या प्रतीक्षेत जिवन जगत आहेत. अवयवदानाबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच जमिनीत पुरले जाणारे आणि अग्निच्या स्वाधीन होणारे शरीरातील अवयव अनेकांना जीवनदान देऊ शकतील. आजच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांचे अवयव निकामी होताना दिसून येतात. प्रामुख्याने यात शुगर, म्हणजेच मधुमेहसारखे आजार आहेत. पण कोरोनाच्या काळात काही ब्रेन - डेड व्यक्ती हे अवयव दान करण्यास पुढे आले ही समाधानाची बाब आहे. यामुळे त्या शस्त्रक्रिया करून काहीशा लोकांना जीवदान मिळू शकले आहे. विशेष म्हणजे एक ब्रेन-डेड व्यक्ती हा सात ते आठ लोकांना जीवनदान देऊ शकतो. साधारण दोन किडनी, एक लिव्हर, हार्ट, दोन डोळे हे प्रमुख अवयव आहेत, ज्यांची गरज अनेकांना आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कौतुकास्पद काम होत आहे. मात्र आजही अवयवदानाबाबत लोकांचे गैरसमज दूर करण्याची प्रकर्षाने गरज निर्माण झालेली आहे.
विविध कारणांनी अवयव निकामी झाल्याने एकेका अवयवासाठी अनेक दिवस वाट बघत आयुष्य काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे जी वस्तुस्थिती आहे. खरेतर मरणोत्तर अवयवदानाबद्दल बऱ्याच रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे याबाबतची जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. अवयवदानासारखे दान जगात दुसरे कुठले नसून एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याने दान केलेल्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचवता येतात. कुणी जन्मताच अवयवरहित असतो, कुणाच्या अपघातात अवयव निकामी होतात, कुणाचे अवयव अचानक निकामी होतात, त्यांना वेळीच अवयव मिळाले नाही तर त्यांचे आयुष्य संपते. आयुष्याच्या प्रवासातील त्यांचे जगणे थांबून जाते. अशा वेळी ह्या अवयवांचे महत्व खूप वाढते. त्यांना एखाद्या अवयवदात्याचे अवयव प्राप्त झाले, त्याचे प्रत्यारोपण झाले तर त्याला नवे जीवन मिळू शकते, त्याचा जीवनप्रवास पुन्हा त्याच आनंदाने सुरू होतो, अवयव दात्याला देखील त्याच्या अवयवांच्या दानातून दुसऱ्या माणसाच्या शरीराच्या माध्यमातून जिवंत राहता येते. अवयवदानासारखे सुख इतर कशात नाही. मात्र आपल्या देशात अवयवदायाबाबत फारशी जागृती नाही. इतर देशांत म्हणजेच आॅस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिकेसारख्या देशांनी अवयवदान चळवळीचे महत्त्व पूर्वीच ओळखले. यासाठी वैद्यकीय, शासन व सर्वसामान्य जनता अशा तिन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती घडवून आणली. त्यामुळे आज परदेशांत अवयवदानातून हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. भारतात अवयवदानाचा टक्का कमी आहे. अलीकडच्या काळात हा टक्का थोडाफार वाढल्याचे दिसून आले आहे मात्र त्याची टक्केवारी अधिक नाही हेदेखील तितकेच खरे आहे.
माणूस आपले अवयव निर्माण करु नाही मात्र हेच अवयव तो दान करु शकतो. मृत्यूला रोखण्याची ताकद या अवयवदानात आहे. कायदयानुसार मानवी अवयवांची विक्री करता येत नाही मात्र त्यांचे दान करता येते. अवयवदानानंतर मिळालेल्या अवयवाचे व्यवस्थीत प्रत्यारोपण व्हावे व त्यादरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून शासनाने त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आणला आहे. सन १९९४ साली 'मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' आपल्या देशात अस्तित्वात आला व अवयव प्रत्यारोपणास कायदेशिर मान्यता मिळाली. अवयवदान जिवंतपणी आणि मृत्यूनंतरदेखील करता येते. जिवंत असताना एक मूत्रपिंड (किडणी), यकृताचा (लिव्हरचा), आतडयाचा, स्वादुपिंड व फुफुसाचा काही भाग आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना सरकारची परवानगी काढून कायदयाने दान देता येतो. रक्ताच्या नातेवाईंकांत सुधारीत कायदयानुसार आई-वडील, भाऊ–बहिण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी- आजोबा, नातवंडे यांचा समावेश होतो. माणसाच्या मृत्यूनंतर ह्रदय क्रिया बंद पडते व त्यानंतर सर्व अवयव दान करण्यासाठी निकामी होतात. केवळ नेत्र, त्वचा, अस्थी (हाडे) इत्यादी मरणानंतर ४ ते ५ तासांच्या कालावधीत दान करता येऊ शकतात. गंभीर जळालेल्या व्यक्तीचे प्राण त्वचेच्या दानाने वाचवता येतात तर नेत्रदानाने अंध व्यक्तीस दृष्टी प्रदान करता येते. त्यामुळे अवयवदानातून वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती शक्य आहे ज्यायोगे अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. अलिकडल्या काही उदाहरणांवरून मरणोत्तर अवयवदानाबद्दल लोकांच्या मनात काही प्रमाणात जागृती होताना दिसत असून त्यामुळे समाजात संवेदनशीलता वाढत असल्याची बाब नक्कीच समाधानकारक आहे.
वैभव मोहन पाटील
कक्ष अधिकारी, अभियान संचालक कक्ष
राष्ट्रीय आरोग्य अभियान
Comments
Post a Comment