निर्णय झाला , अंमलबजावणी कधी

नवी मुंबईतील ५०० चौ फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे. नवी मुंबई हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व सक्षम शहर आहे. मालमत्ता करातून मिळणारा महसूल कमी झाल्यास त्याचा फार बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार नसल्याने हा निर्णय व्यापक जनहीताचा म्हणावा लागेल. गेल्या काही वर्षांत पालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्रोत व विस्तार झालेला आहे. यामुळेच सामान्य लोकांचा अर्थभार कमी करण्यासाठी मालमत्ता करातून सूट देण्याचा पालिकेचा प्रस्ताव ऐतिहासिक आहे. मात्र येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा राजकीय लाभ उठवण्याचादेखील पुरेपूर प्रयत्न राजकीय पक्षांकडून होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे. मात्र याचे श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाला गेले तरी लोकांना थेट या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याने सर्वसामान्यांना या नाहक श्रेयवादाने काही फरक पडणार नाही. वास्तविक या शहरात अगदी उच्चभ्रू व्यक्तींपासून ते सर्वसामान्य लोक वास्तव्य करतात. सर्वसामान्य नागरिक राहत असलेल्या बहुतांश घरांचा आकार हा पाचशे चौरस फुटापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर माफ झाल्यास त्यांना मोठा दिलासाच मिळणार आहे. महागाईने कोलमडलेले गृहिणींचे बजेट या निर्णयाने काही प्रमाणात रुळावर येण्यास नक्कीच मदत होईल. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय हेतूने घोषणा व निर्णय होतात मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास प्रचंड अडथळे निर्माण होण्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होते हे पाहावे लागेल.



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त