विचारवंतांनी मानेंच्या पाठीशी उभे राहावे

अभिनेते किरण माने यांना राजकीय पोस्ट करत असल्याचे सांगत एका वाहिनीने व निर्मात्याने त्यांचेवर मालिकेतून काढून टाकण्याची केलेली कारवाई एका जागरूक नागरिकाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला आहे. अशा पद्धतीची कथित निरपेक्षवादी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे. किरण माने सोशल मीडियावर येणाऱ्या विविध पोस्टवर आपल्या शैलीत सातत्याने परखड लिखाण करतात. एखादी न पटणारी गोष्ट, आवडणारी-नावडणारी व्यक्ती, राजकीय पक्ष कींवा सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग त्याचे कार्यक्षेत्र कुठलेही असो. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असताना आपल्या मतस्वातंत्र्याचा अधिकार जोपासताना अनेक कलावंत, खेळाडू, प्रशासनिक अधिकारी दिसतात. मात्र या कारणाने त्यांची गळचेपी करत घटनाधिकार हिरावून घेण्यासाठी दबाव निर्माण करणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. शेवटी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच हवे. ते कुणाला पटत नसेल तर त्यावर दुमत व्यक्त करण्याचा अधिकारदेखील सर्वांना आहे. मात्र किरण माने राजकीय मते व्यक्त करतात म्हणून कुणाच्यातरी दबावाला बळी पडून त्यांचे काम हिरावणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारणच आहे. त्याला मागील आठवड्यातच किरण मानेंनी उत्तर देताना “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर पोस्ट करत दिलेले उत्तर त्यांची विपरीत परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत लढण्याची जिद्द दाखवते. साहित्यिक व विचारवंतांनी किरण मानेंच्या मागे ठामपणे उभे राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रवृत्ती थोपवण्यासाठी चळवळ उभारावी.


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त