क्रिकेटला अवाजवी महत्व नको
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकीकरण झाले. क्रिकेटरसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे जाहिरातीसाठी योग्य जागा म्हणून या खेळात व्यापारी कंपन्या व उद्योजकांनी मोठ्या संख्येने उडी घेतली. आयपीएलसारखे मर्यादित षटकांचे सामने या खेळातील शैली व खेळाडूवृत्ती हिरावू पाहत आहेत. त्यातच बीसीसीआयमधील राजकारण, सिनेसृष्टीचाही या खेळात वाढता हस्तक्षेप यामुळे क्रिकेटचे बाजारीकरण झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती नाही. मुळात आपल्या देशात क्रिकेटला अवाजवी महत्व दिले गेल्याने पारंपारिक इतर भारतीय खेळ लुप्त झाले आहेत. कबड्डी, टेनिस, फुटबॉल यांसह ऑलिम्पिक खेळाडू मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेले आहेत. या खेळांना म्हणावे तितके बळ न दिले गेल्याने भारतात आज क्रिकेटशिवाय दुसरे खेळ आहेत की नाही इतपत शंका येते. ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये अजूनही आपल्याला फार मोठे यश मिळत नाही कारण त्यातील खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आजही ऑलिम्पिकमध्ये मोजक्या पदकांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे क्रिकेटची मखलाशी थांबवून देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध खेळांमधील नैपुण्यप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारमधील क्रीडा विभागाने आपले अस्तित्व दाखवून देण्याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment