निर्बंधांचे पालन करा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत चालली आहे. मोठया प्रमाणावर फैलावलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घातले जात आहेत. असे असले तरी पहिल्या दोन लाटांमध्ये लोकांमध्ये कोरोनाची असलेली दहशत आता कमी झालेली आहे. उपचाराने या आजारावर सहजपणे मात करता येत असल्याने लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने चाचणी करून घेऊन औषधोपचार करून घेण्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे. यामुळे जितक्या संख्येने रुग्ण भरती होत आहेत त्यापेक्षा जास्त संख्येने रुग्ण बरे होऊन येत्या काळात बाहेरदेखील पडणार आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आता आपल्यातुन पूर्णपणे जाणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण सापडणारच आहेत. मात्र हा संसर्ग होऊ न देणे व झाल्यानंतर योग्य उपचार वेळेत घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लॉकडाऊनचा पर्याय समर्थनीय नक्कीच नाही. लॉकडाऊन मुळे उद्भवलेली विपरीत परिस्थिती अजूनही रुळावर येत नाहीये. उध्वस्त झालेले उद्योगधंदे, नोकरदार, शिक्षणव्यवस्था अद्याप सावरायचा प्रयत्न करतेय. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करणे लोकांचा रोष ओढवून घेण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याऐवजी घालण्यात आलेल्या निर्बंधांची सक्तीने अंमलबजावणी करणे हा योग्य पर्याय आहे. सरकारने निर्बंध घातलेत मात्र त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच तोकडी असून जोवर त्यावर प्रभावी सनियंत्रण होत नाही तोवर त्या निर्बंधाना देखील अर्थ उरत नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर निर्बंध, सभा, कार्यक्रम, समारंभातील गर्दीवर मर्यादा, सार्वजनिक प्रवासात सामाजिक अंतर, मास्क वापराच्या बाबतीत सक्ती या बाबी कटाक्षाने पाळल्या तर संसर्ग रोखला जाऊ शकतो.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment