जॉय ऑफ गिव्हिंगची पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी व वृद्धाश्रमास मदत - नवे वर्ष नवा उपक्रम
जॉय संस्थेनी केली वाडा-काटी गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत
शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जॉय ऑफ गिव्हिंग मुंबई सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील काटी या दुर्गम खेडेगावातील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. जॉय ऑफ गिव्हिंग मार्फत समाजातील गरीब, गरजू व दुर्बल घटकांना सातत्याने विविध स्वरूपात सहाय्य करण्यात येते. संस्थांमार्फत आजवर महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या आदिवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथालयांना मदत करण्यात आलेली आहे. काटी गाव हे पालघर जिल्ह्याचे दुर्गम व अखेरचे टोक. या गावातील शाळेत बालवर्गात ४५ मुले तर प्राथमिक शाळेत ५० विद्यार्थी शिकत असून सर्व विद्यार्थी आदिवासी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकात मोडतात. त्यांचेपर्यंत मदत पोहोचवण्याची आवश्यकता लक्षात घेता शनिवारी सकाळी जॉय संस्था व शाळेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बालवर्गाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य तर प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांना दैनंदिन गरजेच्या किराणा वस्तूंचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. तसेच शाळेला रंगकाम करण्यासाठीदेखील रु ८०००/- आठ हजार मात्र) आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.यावेळी स्थानिक उद्योजक संजय मिश्रा यांनी पावसाळ्यापूर्वी शाळेचे जुने सिमेंट पत्रे बदलून ते नवीन देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाप्रसंगी जॉय संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे, संस्थेचे सभासद भूषण मुळे, चंद्रशेखर सावंत, योगिता हिरवे, गजानन पाटील, सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी डॉ अविनाश भागवत, डॉ प्रशांत भोईर, वैभव पाटील, देवघर गटातील शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्री गुरुनाथ पष्टे, गावचे पोलीस पाटील दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, शालिनी ठाकरे, अंगणवाडी सेविका सुमंता सदाशिव पाटील, जेष्ठ ग्रामस्थ ह भ प परशुराम पाटील, भरत पाटील, सुनील पाटील, श्याम ठाकरे, उद्योजक संजय मिश्रा, निखिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पालक वर्ग, महिला मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जाधव सर यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणेश हिरवे सर हे होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागतसत्कार ग्रामस्थ व शाळेच्या वतीने श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तर जॉय संस्थेच्या वतीने केंद्रप्रमुख, शिक्षक, पोलीस पाटील यांचा सत्कार शाल, पुस्तक देऊन करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत मनमोहक नृत्ये व कला सादर केल्या ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री गुरुनाथ पष्टे, डॉ अविनाश भागवत, डॉ प्रशांत भोईर, चंद्रशेखर सावंत, वैभव पाटील, योगिता हिरवे आणि गणेश हिरवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. जॉय संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना अध्यक्ष गणेश हिरवे यांनी उपक्रमाचा उद्देश तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख पष्टे सर यांनी जॉयचे आभार मानत नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आपल्या सेवानिवृत्ती अगोदर शाळेला आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला. डॉ भोईर यांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना उपस्थितांसमोर विषद केल्या तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटपदेखील त्यांनी यावेळी सर्वांना केले. डॉ भागवत यांनी आपल्या मनोगतात दानाचे महत्व स्पष्ट करताना गावचे गावपण जपण्याचा मौलिक सल्ला मुले तसेच ग्रामस्थांना दिला. वैभव पाटील यांनी आपल्या गावाकडच्या व शाळेतील आठवणींना उजाळा देताना शाळा, शिक्षक, विद्यार्थी व गावावर आधारित सुरेल कविता सादर केली. शेवटी मुख्याध्यापक जाधव सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. एका सुंदर व नियोजनबद्ध विद्यार्थी मदतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी जॉय संस्थेच्या सर्व सभासदांना भरभरून धन्यवाद दिले.

very nice progrma bro...wish you all the best..
ReplyDeleteसमाजातील दुर्बल घटकांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात देणाऱ्या जॉय संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच कार्य संस्थेने करत रहावे. संस्थेच्या संस्थापक गणेश सरांना मी दीर्घायुष्य चिंतीतो.
ReplyDelete