छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- Get link
- X
- Other Apps
शिवछत्रपती जयंती. मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी ज्या दिवशी एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला तो दिवस. ज्या काळात मुघल सम्राज्यविरुद्ध मुखातून ब्र काढण्याची सोय नव्हती त्या काळात मराठी मुलखाची शान असणारा भगवा हातात घेऊन मुघलांच्या ताब्यातील गड, किल्ले व मुलुख परत मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारा स्वाभिमानी राजा म्हणजे शिवछत्रपती. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर फत्ते केलेल्या अनेक मोहिमा आज आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर या तेजस्वी ता-याचा जन्म झाला व त्याने न भुतो असा इतिहास घडवला. मर्दमराठी मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मुघलांना सळो कि पळो करून सोडणारा आमचा शिवाजी. ज्याचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे व ज्याच्या वंदनाशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात करता येत नाही तो तमाम मराठ्यांचा व हिंदूंचा आदर्श म्हणजे शिवछत्रपती. मराठी माणसाला स्वाभिमानाने व ताठ मानेने आपल्या न्याय व हक्कांसाठी जगायला शिकवणारे आमचे शिवाजी महाराज आज देशातच नव्हे तर जगात आदर्श व्यक्तिमत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्ा रत्नपारखी राजा होणे नाही. राजांनी मवाळ्यांमधून स्वराज्यासाठी रत्ने घडविली. महाराज इतिहासाचे महानायक होते तर मावळे इतिहासाचे आधारस्तंभ. मुघलांच्या पाशवी साम्राज्याला, सर्वच बाबतीत मग ते तिन्ही दलांचे सैन्य, शस्त्रसाठा या बाबतीत उजवे असणाऱ्याना मोजक्या मावळ्यांच्या जोरावर आपल्या गनिमी काव्याच्या आधारावर लढा देऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी झटणारे छत्रपती पुन्हा होणे नाही. शत्रूची प्रत्येक चाल अत्यंत दक्षपणे हेरून त्यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देणारा आमचा राजा आज आम्हाला अनेक उदाहरणााांवरून वारंवार आठवला जातो. अफजलखानाचा वध असो कि शाहिस्तेखानानाची फजिती यासारख्या अनेक घटनांतून शिवाजी महाराजांचा परिचय आम्हाला व येणाऱ्या अनेक पिढ्यांना उद्बोधकच राहील. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अचाट बुद्धिमतेच्या व युद्धकौशल्याच्या जोरावर गड, किल्ले, सुभेदार्या शत्रूच्या ताब्यातून परत मिळवून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली व पारतंत्रयाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकत सामाजात निर्माण केली. कर्तबगारी, स्वाभिमान, मातृभूमीप्रेम, विधायक दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध उठाव, परस्त्रीबद्दलचा आदर, मराठी अस्मितेचा पुरस्कार, कुशल नेतृत्व या बाबी आजच्या पिढीला छत्रपतींकडूनच अनुकरणीय आहेत. इतिहास लिहिणारे अनेक झाले पण इतिहास घडविणारे फक्त आमचे शिवछत्रपतीच. संपूर्ण जगाला स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व असलेल्या शिवाजी राजांचा जुलमी सत्तेला संपविण्याचा कित्ता अनेकांनी गिरवला. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीतून धडे घऊन चीन, व्हिएतनाम सारखे असंख्य देश जुलमी दोरखंडातून मुक्त झाले.परन्तु दुर्दैवाने आजच्या काळात आपल्या देशातिलच अनेक लोकांना त्यांच्या पराक्रमाबद्दल व शोर्याबद्दल पुरेशी माहितीच नाही याबद्दल खेद वाटतो. शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व जन्माला घालणाऱ्या जिजाउंसारख्या मातेला, शहाजींसारख्या पित्याला, त्यांना युद्धकौशल्याचे धडे देणाऱ्या दादोजी कोंडदेव व त्यांच्यामागे सर्वस्व अर्पण करून उभे ठाकणाऱ्या बाजीप्रभु, येसाजी, संभाजी कावजी, रामजी पांगेरा, भंडारी, जीवा महाला, रायबा यासारख्या अनेक मावळ्यांना देखील या निमित्ताने मानवंदना. शिवरयांसोबत मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार करताना अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गडकिल्यावरील बुरजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा व स्वराज्यप्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम व स्वराज्यासाठी त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे.
आज कोणताही राजकीय पक्ष असो शिवछत्रपतींना वंदन केल्याशिवाय पुढे सरकत नाही. म्हणूनच शिववंदनेसाठी कोणत्याही जात धर्म पंथ पक्षाचा अडसर आज येत नाही. शासनाच्या वतीने मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे आज जागतिक पातळीवरचे स्मारक तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे स्मारक उद्या मुंबई महाराष्ट्रासाठी शिवछत्रतींचे जागतिक बलस्थान व शक्तीस्थान बनेल अशी आशा करण्यास हरकत नाही. छत्रपतींच्या कार्याची महती आपल्या भावी पिढ्याना कळण्यासाठी शिव स्मारकांची निर्मिती राज्यातील जिलह्याजीलह्यात व महानगरपालिकात झाली पाहिजे. मराठी धर्म व मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर येणाऱ्या काळात आपल्या समाजाला छत्रपती कळालेच पाहिजेत. मराठी माणसाने आपापसातील तंटे मिटवून शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपल्या न्याय व हक्कांसाठी एकत्र आले पाहिजे. महाराजानी आयुष्यभर फक्त माणसे जोडण्याचे काम केले आणि म्हणूनच मराठी पताका साता समुद्रापार फडकू शकली व भगवी लाट प्रभावी ठरून मुघल व परदेशी सत्तेचा नायनाट झाला. नाहीतर आजदेखील आपण त्याच पारतंत्रयाच्या छायेत असतो याचे भान असु द्या. शिवाजी महाराजांनी मराठी माणसावर अतोनात प्रेम केले परंतु त्यांनी इतर धर्माच्या लोकांनादेखील कधीही दुरावू दिले नाही. महाराजांकडे जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार होते. नूरखान बेग हा पायदलाच प्रमुख होता तर सिद्दी इब्राहिम हा अंगरक्षक. दौलत खान, इब्राहिम खान, सुलतान खान असे एक ना अनेक मुस्लिम सरदार होते ज्यांची नावेही आपणास ज्ञात नाहीत. स्वराज्याची लढाई हि सर्वाना सोबत घेऊनच लढली जाऊ शकते हि भावना शिवप्रभूंनी सर्व स्तरात रुजवली. जातीपातीचे, धर्माधर्माचे व स्पृश्य अस्पृश्याचे राजकारण करणाऱ्या लोकांना महाराजांनी समानतेचा एक मोठा आदर्श घालून दिला. परन्तु आज आपल्या समाजातील सर्वच बाबतीतील भेदभावाचे राजकारण, मराठी माणसे व नेत्यांतील फुटीचे राजकारण, आपसातील वैर, यामुळे खच्ची होत असलेला मराठी माणूस पाहताना सर्वात मोठा खेद महाराजांना होत असावा. ज्या उद्देशाने स्वराज्य घडविले त्या उद्देशालाच तडा पडण्याचे काम होत असताना राजांच्या मनाला किती वेदना होत असतील याची कल्पना करा. नोकरी, व्यवसाय, शिक्षण या सर्वच क्षेत्रात मराठीला आज अस्तित्वासाठी झगडावे लागत असल्याचे पाहून शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. केवळ शिवजयंतीला शिवरायांची आठवण करण्याऐवजी त्यांनी दिलेले धडे, शिकवण व त्यांचे कर्तृत्व याचे अनुकरण झाले पाहिजे. यासाठी शिवचरित्रासारखे महाराज्यांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक वाचन उपलब्ध आहे. त्याचे ज्ञान आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढीलादेखील करून देण्याचा संकल्प आपण या निमित्ताने करू या.
जयंती दिनाच्या निमित्ताने या महापुरुषाला मानाचा मुजरा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment