वाईनबाबत स्पष्टता करावी
महाराष्ट्रात किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यात वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच वाईन उद्योगाला चालना मिळावी, या हेतूने राबवण्यात येत असल्याचे सरकारी म्हणणे आहे. मात्र वाईन हा शब्द केवळ शेतीजन्य पिकांशी संबंधित आहे असे मानने संयुक्तिक ठरणार नाही. कारण राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या सर्व दुकानांना वाईन शॉप म्हणून संबोधले जाते. वाईन हा प्रकार पूर्णतः अल्कोहोलमुक्त नाही, त्यामुळे तो नशेच्या प्रकारातच मोडतो. त्यामुळे वाईनला किराणा दुकानात विकायला परवानगी दिल्यास त्याचा वापर सर्रास होण्याची शक्यता आहे. वाईनचे औषधी वापर असतील तर ते लोकांना अगोदर पटवून द्यायला हवेत. वाईनमध्ये समाविष्ट घटक जाहीर करायला हवेत. अचानकपणे घेतलेल्या ह्या निर्णयाने सर्वत्र आरोप प्रत्यारोप, शंका कुशंकांना वाव मिळत आहे. वाईनच्या बाबतीत अनेक संभ्रम सध्या राज्यातील जनतेत आहेत. वाईन हा प्रकारच मुळात मद्याशी संबंधित असल्याने त्याच्या खुल्या विक्रीचे समर्थन करता येणार नाही. वाईन हा मद्याचा प्रकार नसेल तर दारू विक्री दुकानांच्या (वाईन शॉप) नावात 'वाईन' हा शब्द कशासाठी याचा उलगडा व्हायला हवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment