सरकारने सकारात्मकता दाखवावी
- Get link
- X
- Other Apps
गेल्या ३ महिन्यांपासुन सुरु असलेला एसटीचा संप आता प्रवाशांच्या अंगवळणी पडला असला तरी ग्रामीण जनतेला त्याचा फार मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. शहरी जनतेवर एसटी संपाचा फार मोठा परिणाम जाणवत नसला तरी ग्रामीण जिवनवाहिनी समजली जाणारी एसटी बंद झाल्याने ग्रामीण दळणवळण पूर्णतः मंदावले आहे. खाजगी वाहतुक सर्वांनाच परवडत नाही किंवा अनेक ठिकाणी उपलब्धच नाही. अशा परिस्थीतीत शालेय विदयार्थी, शेतमालवाहतूक करणारे शेतकरी, रोजगारासाठी घराबाहेर पडणारे चाकरमानी असे सर्वच घटक एसटी संपाने बाधित आहेत. यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटत आहे. एसटी विलीनीकरणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी हा संप दोन्ही बाजुंनी सामोपचाराने मिटवायला हवा होता. एकमेकांना जबाबदार धरुन लोकांचे हाल करण्यात काही अर्थ नाही. या संपाने राज्यात उदभवलेली अभूतपूर्व व गंभीर परिस्थीती लक्षात घेता न्यायालयाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल विनाविलंब सरकारकडे सादर करायला हवा. तसेच सरकारनेदेखील सकारात्मकता दाखवत एसटी कर्मचा-यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सेवेचा व मागण्यांचा विचार करुन निर्णय घ्यावा. मात्र तोवर प्रवाशांना वेठीस धरुन कर्मचा-यांनी संप सुरु ठेवणे संयुक्तीक ठरणार नाही. निषेधाच्या इतर संसाधनांचा वापर करुन संपाचे हत्यार तुर्तास म्यान करुन एसटी कर्मचा-यांनी लवकरात लवकर कर्तव्यावर रुजू होणे व्यापक लोकहिताचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment