वॉटर टॅक्सीचे दर कमी करा

मोठया प्रतिक्षेनंतर मागील आठवडयात केंद्र व राज्‍य शासनाच्‍या प्रयत्‍नाने नवी मुंबई शहराला मुंबईशी जोडणारी बेलापूर ते भाऊचा धक्‍का ही देशातील पहिली वॉटर टॅक्‍सी सेवा अखेर सुरु करण्‍यात आलेली आहे. बेलापूर जेट्टीवरून सुटणारी ही वॉटर टॅक्सी भाऊचा धक्का आणि एलिफन्टा या दोन मार्गांवर जाणार आहे.  मात्र ही वाहतूक नियमित प्रवासी वाहतूक आहे की केवळ पर्यटनासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या जलवाहतुकीच्‍या प्रवासाचे असलेले दर पाहता ही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्यांपासून दूरच राहणार असल्याचे चित्र आहे. अनेक जण मोठ्या उत्साहाने या वॉटर टॅक्सी सेवेचा लाभ घेण्यासाठी बेलापूर जेट्टीवर जात आहेत, मात्र येथील प्रवासीभाडे ऐकून त्यांचा हिरमोड होत असून ते माघारी परतत आहेत. त्यामुळेही वॉटर टॅक्सी सेवा सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना परवडणारी नसल्‍याने त्‍याचा काहीही लाभ दररोज मुंबईकडे प्रवास करणा-या नवी मुंबईकरांना होणार नाही. बेलापूर ते भाऊचा धक्का यासाठी १२०० रुपये आणि घारापुरीसाठी ६६० रुपये तिकीटभाडे आहे. बेलापूर ते मुंबई मासिक पास तर १२ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे हे प्रवासभाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच आहे. या जलमार्गाने भाऊच्या धक्क्यापर्यंत ३० ते ३५ मिनिटांत पोहोचता येते. तर, घारापुरी बेटावर केवळ १५ मिनिटांत पोहोचता येते. त्यामुळे ही सुविधा वेळेच्या दृष्टीने सोयीची असली तरी जलप्रvवासासाठी इच्छुक असणाऱ्यांचा अवाजवी तिकीटदरामुळे हिरमोड होत आहे. त्‍यामुळे ही प्रवासी वाहतूक केवळ श्रीमंतांच्‍या सुविधेसाठीच केली आहे का असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांना पडला आहे. महिन्‍याला ३० ते ४० हजार कमावणारा सामान्‍य व मध्‍यमवर्गीय चाकरमानी १२ हजार प्रवासी भाडे कसे देईल याचा विचार तिकीट दर ठरवताना केलेला दिसत नाही. तसेच बेलापूर वगळता नवी मुंबईच्‍या वाशी, ऐरोली, घणसोलीपर्यंतच्‍या नोडमध्‍ये राहणा-या लोकांनादेखील बेलापूरपर्यंत बस, टॅक्‍सी, रिक्‍शाने प्रवास करुन या सेवेचा लाभ घ्‍यावा लागणार आहे जो शक्‍य होणार नाही. अवाजवी तिकीट दरांमुळे लोकांचा प्रतिसाद या सेवेला मिळेल असे वाटत नाही. त्‍यामुळे या जलवाहतूकीचे तिकीट दर सर्वसामान्‍यांच्‍या अवाक्‍यात आणावेत तसेच या बोटीला वाशी व इतर काही ठिकाणी चाचपणी करुन थांब्‍यांची व्‍यवस्‍था केल्‍यास अधिकाधिक लोकांना त्‍याचा लाभ घेणे शक्‍य होईल.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई 


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर