अशाने कृषिप्रधान देश म्हणून ओळख पुसली जाईल

अनियमित ऋतुचक्र, सततचा दुष्काळ, अवकाळी पर्जन्यमान व वाढता कृषी खर्च यामुळे शेतीची अवस्था आज दोलायमान स्थितीत आहे. उत्पन्नाची हमी राहिलेली नसल्याने शेतकऱ्यांची मुले आज शेतीकडे वळत नाहीत. एकेकाळी सर्वाधिक भाताचे उत्पादन घेणाऱ्या कोकणात तर शेतकरी केवळ नावाला शिल्लक आहे. मौसमी पिके घेणारा शेतकरी आज कर्जबाजारी अवस्थेत आहे. शेतीला जोडधंदे निर्माण झाले मात्र ते करण्यासाठी इच्छाशक्ती व रिस्क वाढल्याने फार लोक त्याकडे वळत नाहीत. शहरात येऊन नोकरी, धंद्यात स्थिरावण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे ज्यात नियमित व वाढत्या उत्पन्नाची हमी निश्चितपणे मिळते. हीच परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांत राज्यातील शेती नामशेष होईल. यासाठी शेतकऱ्यांना सरकारी बळ देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्जबाजारी होऊ न देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शेतीपिकांना हमीभाव, बिनव्याजी कर्ज, सहजसाध्य कर्जप्रक्रिया, शेतीत नव्या प्रकारांचा व प्रजातींचा समावेश, अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या पिकांचा प्रसार अशा उपाययोजना शेतीतील गुंतवणूक वाढवतील. शेतीमधील कष्ट कमी व्हायला हवेत. त्याचप्रमाणे वाढत्या औद्योगीकिकरणाने व नागरिकीकरणाने लुप्त होत चाललेली शेतजमीन जतन करणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा कृषिप्रधान समजला जाणारा आपला देश अन्नधान्यासाठीदेखील परावलंबी होईल. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त