कोरोना काळातही समतोल
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाने भारतीय जनजीवन व अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. करप्रणालीत निर्माण झालेली तूट देशाच्या अर्थकारणावर थेट परिणाम करणारी ठरत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प नक्कीच समतोल साधणारा आहे. शिक्षण व आरोग्यासारख्या महत्वपूर्ण बाबींवर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित करण्यात आले असून तो रोजगार व डिजिटल व्यवहारांना चालना देणारादेखील आहे. आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेली वाढीव तरतूद आरोग्यव्यवस्थेला बळकट करणारी ठरणार आहे. खाजगी बँकांची कमी होत चाललेली विश्वासार्हता पाहता पोस्ट ऑफिस बँकिंगला बळ मिळाल्यास लोकांना आर्थिक सुरक्षिततेचा चांगला पर्याय मिळेल. ऑनलाइन शिक्षणाचे वाढते महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्याचा पर्याय स्वागतार्ह आहे. 'हर घर नल से जल' तसेच नदी जोड प्रकल्प जलसमृद्धी मिळवून देणारे आहेत. वाढत चाललेले खाद्यतेलाचे भाव पाहता तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्याची भूमिका आगामी काळात सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कमी करेल अशी आशा करण्यास हरकत नाही. जवळपास ४० लाख कोटींचा हा अर्थसंकल्प काही प्रमाणात कर्जाधारीत असला तरी त्यातून विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment