व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा
व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा
४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन व ५ फेब्रुवारी हा मौखिक आरोग्य दिन. कर्करोग व मौखिक आरोग्य हे परस्परांना पूरक घटक आहेत. तंबाखूमुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखुच्या सेवनाने नानाविध आजार बळावतात व त्यामुळे मृत्यूदेखील ओढवतात. तंबाखू सेवनाने जगामध्ये साधारणतः ५ दशलक्षच्या वर लोक विविध आजारांनी मृत्यू पावत आहेत. भारतात हिच संख्या १० लक्ष इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करतात व या वापरामुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुसंकत्व, कमी वजनाचे – व्यंग असलेले – मृत्यु पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधीदेखील तंबाखुसेवनाशी निगडीत आहेत. यामुळे लोकांमध्ये अकाली मत्युंचे प्रमाण वाढलेले आहे.
१३ ते १५ वर्षे वयोगटातील जवळपास १५ टक्के मुलांमध्ये तंबाखुसेवनाच्या प्रमाणाचा आलेख चढता आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखुच्या पदार्थांचे व्यसन सर्वाधिक केले जाते. शालेय विदयार्थ्यांमध्ये या व्यसनांचे प्रमाण खुप चिंताजनक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती शालेय विदयार्थ्या्ंपर्यंत प्रभावीपणे पोहाचणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा भस्मासुर विदयार्थी दशेतच अनेक मुलांमध्ये पसरत जाऊन त्यांच्या शैक्षणिक आयुष्याबरोबरच आरोग्यदायी जिवनदेखील उध्वस्त होईल. केंद्र शासनाने यापुर्वीच शालेय विदयार्थ्यांसाठी तंबाखु निंयंत्रण कायदा बहुतांशी राज्यांमध्ये सुरु केलेला आहे. यामध्ये शिक्षण संस्थांचा सहभाग हा अत्यंत महत्वपूर्ण आहे जेणेकरुन आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातुन दुष्परिणामांबाबत जनजागृती करता येईल. शाळेपासुन महाविदयालयांपर्यांत मुलांचा संबंध येत असल्याने शाळा–महाविदयालये तंबाखु सेवनाच्या नियंत्रणामध्ये मोलाची भुमिका बजावू शकतात. लहान वयापासुन मुले हया व्यसनांकडे आकर्षित होत असल्याने शाळांच्या माध्यमातुन त्यांना व्यसनांपासुन परावृत्त केले गेले पाहिजे. यासाठी तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे.
व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडुन अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी केंद्र सरकारने तंबाखू नियंत्रण कायदा २००३ लागू केलेला असुन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमदेखील राबविण्यात येत आहे. या कायदयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, १८ वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखुचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूविक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनांवर धोक्याच्या सुचना देणे यांचा अंतर्भाव होतो.
लहान मुलांमधील व्यसनांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भुमिकादेखील अत्यंत महत्वाची असुन पालकांनी मुलांसमोर व्यसन न करता व्यसनांपासुन परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेष्ठांचेच अनुकरण मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होऊन जातात. त्यामुळे व्यसनांपासुन मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनांपासुन परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासुन त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासुन लांब राहणे, वैदयकीय मदत घेणे यासाखे उपाय करता येतील. तंबाखु व इतर व्यसनांपासुन जनतेला परावृत्त करण्यासाठी शासनस्तरावरुन व्यापक प्रयत्न होत असुन व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या वाटचालीस सर्व स्तरातील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
वैभव मोहन पाटील
Comments
Post a Comment