धनिकांप्रति इतकी तत्परता का

आयपीएल स्पर्धांनी क्रिकेट या खेळाला पैशांच्या खाणीत नेऊन ठेवले आहे. मोठमोठया खाजगी कंपन्या व उद्योजक या स्पर्धांमध्ये उतरल्याने आयपीएलला एक झगमगाट व तारांकित वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे अगदी खेळाडूंची बोली लावण्यापासून ते चियर गर्ल्सचे नाचकामापर्यंत बाजार खेळात भरतो. धनाढ्य आयोजक, प्रायोजकांमुळे पैशाचा पाऊस या खेळात पडतो. त्यामुळेच ज्या ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात तो परिसर चकाचक करण्याकडे आयपीएल आयोजक व स्थानिक प्रशासनाचा कल असतो. या महिन्यात २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धांसाठी सर्वाधिक सामने खेळवल्या जात असलेल्या नवी मुंबईतदेखील अशीच लगीनघाई पाहायला मिळत आहे. एरव्ही पावसाळा सुरू झाला तरी दिसून न येणारी नागरी कामे आयपीएलच्या तोंडावर इथे पाहायला मिळत आहेत. वास्तविक प्रशासन हे सुविधा स्नेही असायला हवे मात्र धनिकांप्रति तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नेहमीच वावडे राहील्याचे दिसून येते. प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तींच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये सदैव तत्परता दाखवणारी न्यायालये सामान्यांच्या न्यायिक प्रकरणांमध्ये मात्र सुस्त असतात. सामान्यांसाठी तारीख पे तारीख देणारी न्यायालये एखाद्या व्हीआयपी व्यक्तीच्या गुन्ह्याच्या निकालात तत्पर असतात. हीच परिस्थिती आयपीएलच्या बाबतीत दिसून येते. क्रिकेटला मिळणारे महत्व आपल्या देशात इतर खेळांना अपवादानेच मिळते. आयपीएलसाठी रेड कार्पेट अंथरणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार? 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त