चित्रपटांचा वापर केवळ वैचारिक ज्ञानवृद्धिसाठी करावा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
चित्रपटाच्या कथानकावरून वाद होणे ही बाब देशात नेहमीचीच होऊन बसलीय. एखाद्या चित्रपटाचा आशय, संवाद, उद्देश यामुळे विशिष्ट समाज, धर्म, संघटनांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडलेल्या आहेत. यात तथाकथित कट्टरवादी आणि राजकारणी आपली पोळी भाजून घेण्याचेच प्रकार अधिक प्रमाणात घडतात. आता यांमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. काश्मीरमधून 1990 च्या दशकात मोठ्या संख्येने हिंदू पंडितांनी पलायन केलं. काश्मीर सोडून पलायन केलेल्या हिंदू पंडितांवरील अत्याचाराची गोष्ट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटातून लोकांसमोर साकारण्याचा प्रयत्न केलाय. वास्तविक हा चित्रपट काल्पनिक असला तरी त्याला वादग्रस्त काश्मीरची पार्श्वभूमी असल्याने त्यावरून वादविवाद होतील हे निश्चित होते. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं काश्मीर नेहमीच संवेदशील मुद्दा राहिलेला आहे. मुस्लिम बहुल राज्य असलेल्या काश्मिरमध्ये १९८० पासून भारताविरोधात सशस्त्र उठाव सुरू आहे. १९९० च्या दशकात इस्लामिक कट्टरवाद्यांनी काश्मिरमध्ये अल्पसंख्यांक हिंदू पंडीतांना टार्गेट करण्यास सुरूवात केली. या हिंसाचारात अनेकांना जीव गमवावे लागले, तर हजारो लोकांनी काश्मिरमधून पलायन केलं. आपलं घर सोडून निघून गेलेले लोक कधीच परत आले नाहीत. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या चित्रपटाला समर्थन दिलंय. पण, या चित्रपटामुळे सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झालाय. या चित्रपटात काश्मीरचा खरा इतिहास सांगण्यात आलाय व तो काश्मीरमध्ये लोकांवर झालेल्या अत्याचाराचं खरं वर्णन करतो असं काही समीक्षकांचं म्हणणं आहे. तर काही समीक्षक याला इस्लामविरोधी आणि वास्तवाला धरून नाही असं म्हणतात. असे असले तरी चित्रपट हे एक मनोरंजनाचे साधन आहे व त्या दृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे. सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व सत्य कथानकावर आधारित घटनेचा उहापोह करणाऱ्या चित्रपटांतून ज्ञानात नक्किच भर पडते. या चित्रपटांचे आकलन जातीय व राजकीय तेढ निर्माण करण्यासाठी केल्यास ते जास्त नुकसानकारक ठरते. त्यामुळे अशा चित्रपटांचा वापर केवळ आपल्या वैचारिक ज्ञानवृद्धीसाठी केला तर समाजातील बरेच प्रश्न सुटतील असे वाटते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment