राजकारणाला नवी दिशा देणारा निकाल
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर येथे भाजपने अपेक्षित यश मिळवले असले तरी पंजाबमधील निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रस्थापित व आर्थिक सुबत्तेमधील घराण्यांकडे झुकत चाललेल्या राजकारणाची दिशा पंजाबमधील जनतेने बदलून दाखवलेली आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतील आणि शिक्षित उमेदवार उभे करत 'आप' उमेदवारांनी अनेक दिग्गजांना पराभूत केले. देशभरात भाजपची पसरलेली लाट व प्रमुख विरोध पक्ष असलेल्या काँग्रेसची सातत्याने होत असलेली पीछेहाट पाहता भविष्यात भाजपला सक्षम विरोधी पक्ष शिल्लक राहिल की नाही अशी आशंका निर्माण झाली होती. त्याला आम आदमी पक्षाच्या रुपात नवा पर्याय उभा राहत आहे. स्वच्छ चारित्र्याच्या व विकासाभिमुख राजकारणामुळे दिल्ली सरकार समर्थपणे चालवणाऱ्या 'आप'ने आपले उज्वल राजकिय भविष्य सिद्ध केले आहे. पंजाब, गोव्यासारख्या राज्यांत पक्षाची सुरू असलेली वाटचाल आश्वासक आहे. पंजाबमधील जनतेने सोपवलेली एकहाती जबाबदारी पेलण्यात हा पक्ष आगामी काळात किती यशस्वी ठरतो यावर इतर राज्यांमध्ये पक्षाची व्याप्ती निश्चित करणार आहे. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांचे नेतृत्वकौशल्य व पारदर्शक राजकारण पंजाबच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम करेल अशी आशा तूर्तास तरी करायला हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment