हा तर्क वस्तुस्थितीशी विसंगत

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजप हा पक्ष अव्वल ठरल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येदेखील त्याचा परिणाम दिसून येईल असा तर्क लावला जात आहे. मुळात आपल्याकडे लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या पक्षाचे, गटाचे प्रतिनिधीत्व करतात. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येणारा राजकीय पक्ष महानगरपालिका निवडणूक जिंकेल याची शास्वती देता येत नाही. नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांत सत्ता मिळवत बाजी मारली. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणूकांवर होईल असे मानणे तर्कविसंगत आहे. प्रत्येक महानगरपालिकेची रचना, मतदारांचा कौल, नागरी प्रश्न, राजकीय पक्षांचा प्रभाव व लोकप्रतिनिधींचे कार्य भिन्न आहे. स्थानिक पातळीवर लोकांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी सरस असतो. राष्ट्रीय पातळीवर वरचढ ठरलेल्या एखाद्या पक्षाचे नवखे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून ते निवडून आणणे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शक्य आहे. त्यामुळे महानगरपालिकांमधील स्थानिक उमेदवारांचा जनसंपर्क, लोकोपयोगी कामे व त्यांचे लोकांच्या मनातील स्थान यावरच स्थानिक निवडणुकांमधील यश-अपयश अवलंबून आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना महापालिकांमध्ये आपली सत्ता यावी असे वाटत असले तरी वास्तविकतेचे भान ठेवणेदेखील शहाणपणाचे आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त