कृषी पर्यटनाचे मृगजळ

'कृषी पर्यटन धोरणातून समृद्धी' हा अग्रलेख (दै लोकसत्ता २९ मार्च) कृषिक्षेत्राच्या समृद्धीला नक्कीच नवा मार्ग दाखवणारा आहे. या लेखातून निर्माण करण्यात आलेले आभासी चित्र प्रत्यक्षात अवतरले शेतकरी सर्वांगाने समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. मात्र कृषी पर्यटन ही संकल्पना वरकरणी भुरळ पडणारी असली तरी तिची अंमलबजावणी म्हणावी तितकी सोपी नक्कीच नाही. असंतुलित पर्जन्यमान, सततची नापिकी व दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकरी बेजार आहे. उत्पन्नाची कोणतीही हमी नसल्याने शेतकऱ्यांची मुले आज शेतीकडे पाठ फिरवत शहरात येऊन नोकरी धंदा करण्याकडे वळताना दिसतात. वास्तविक शहरी भागात वसलेली अनेक कुटुंबे गावाकडची मूळ शेतीधारक आहेत. मात्र बेभरवशी शेतीव्यवसायामुळे बहुतांश कुटुंबे शेतीपासून दुरावलेली आहेत. कृषी पर्यटन हेदेखील एक प्रकारचे मृगजळ असल्याने त्यातून काय व किती साध्य होईल हे येणारा काळच ठरवेल. शहरी नागरिकांचा ओढा आज गावाकडच्या ओढीने नैसर्गिक स्थळांच्या पर्यटनाकडे वाढत चाललेला आहे ही बाब खरी आहे. त्यांच्यासाठी पारंपरिक शेती व अवजारांच्या सानिध्यात वास्तव्य करणे पंचतारांकित सोयींपेक्षा एक भिन्न अनुभव देणारे असले तरी शेवटी तोदेखील एक व्यवसायच आहे आणि कुठल्याही व्यवसायाच्या यश अपयशाची खात्री देता येत नाही. त्यामुळे कृषी पर्यटनाचा हा प्रयोग सरकारी पाठबळ लाभले तर केवळ धनिक शेतकऱ्यांसमोर पूरक व्यवसायाच्या रुपात उभा राहू शकतो. सर्वसामान्य व गरीब शेतकरी मात्र कृषिपर्यटनाचे हे 'ताक' फुंकूनच पिणार एव्हढे नक्की. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त