वाहतूक व्यवस्थेतील गैरप्रकार रोखणे गरजेचे

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पावती न फाडता आर्थिक 'तडजोड' करून सोडून देण्याचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात मोठया प्रमाणावर वाढले. यामुळे आरटीओ विभागाची फार मोठी बदनामीदेखील झाली आहे. कुठल्या तरी कारणाने वाहने थांबवुन त्यांना भला मोठा दंड आकारला जातो व त्यानंतर वाहनचालकांशी मध्यस्थी करत दंडापेक्षा कमी रक्कम व तीदेखील विना पावतीची घेऊन त्यांना सोडून देण्यात येते. प्रत्येक वाहनचालकाला अशा परिस्थितीचा अनुभव कधी ना कधी आलेला आहे. त्यामुळे आरटीओबद्दल फार चांगली भावना जनमानसात नक्कीच नाही. यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून काही महिन्यांपूर्वी एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रस्त्यातच दंड न करता त्याच्या गाडीचा व गाडीच्या नंबरचा फोटो काढून त्याला दंडाची रक्कम भरण्याचा आदेश थेट त्याच्या राहत्या पत्त्यावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा प्रयोग बऱ्याच अंशी सफलदेखील झाला. यामुळे वाहनधारक आपल्या वाहनांची व वाहतूक नियम पाळण्याची कटाक्षाने काळजी घेऊ लागले. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी चालकांना अडवून त्यांच्याकडून तोडपाणी करत दंड वसूल करण्याचे प्रकार घडताना दिसतात. मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या बाबतीत तर असे प्रकार सर्रास दिसून येतात. अनेक समाजसेवक, लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवून व स्टिंग ऑपरेशन करूनदेखील ठोस, कायमस्वरूपी कारवाई न करता थातुरमातुर कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतूक विभागात बोकाळलेला हा गैरप्रकार रोखणे शक्य झालेले नाही. सरकारी यंत्रणेने तो रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जनजागृती लोकांमध्ये म्हणावी तशी झालेली नसल्यानेदेखील त्याविरुद्ध आवाज उठवला जात नाही. त्यामुळे लोकांनी आता अधिक जागरूकता दाखवत नियम मोडला तर त्याच्या दंडाची रक्कम वाहतूक पोलीसांच्या खिशात न जाता शासनाच्या तिजोरीत कशी जमा होईल याकडे लक्ष दिले तर भ्रष्टाचाराची ही कीड आपोआप नष्ट होईल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त