स्त्री सक्षमीकरण काळाची गरज

८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिला सक्षमीकरण या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपरिहार्य आहे. आज समाजामध्ये दोन मुद्दे अत्यंत प्राधान्याचे आहेत. एक महिलांची सुरक्षा व दुसरे म्हणजे महिलांचे आरोग्य. दररोज देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी जर पाहिली तर ती अत्यंत धक्कादायक आहे. अगदी चिमुकल्या मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत अत्याचाराच्या बळी पडण्याच्या घटना पहिल्या की मन सुन्न होते. एकविसाव्या शतकातदेखील महिलांना पुरुषी अहंकाराचे भक्ष्य व्हावे लागत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. यासाठी महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे. महिला अत्याचाराबरोबरच महिलांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील तितकाच जटिल व संवेदनशील असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला सक्षमीकरणातील पहिले पाऊल महिला आरोग्य हे आहे. स्त्रीचे निरोगी आयुष्य हाच सुखी कुटुंबाचा गाभा आहे. स्त्री निरोगी तर परिवार निरोगी व आनंदी राहील. आज सर्वच क्षेत्रांमध्‍ये महिला प्रगतीपथावर आहेत. क्रिडा, सांस्‍कृतिक, प्रशासकीय, आरोग्‍य, बॅंकींग इतकेच काय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्‍येदेखील महिला सर्वच पातळयांवर आघाडीवर दिसून येत आहेत. स्त्री पुरुष समानतेचा व महिला शक्तीचा जागर सर्वत्र होणे हि बाब जागतिक लोकतंत्राला भूषणावह ठरेल. आज स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता, स्त्री सुरक्षितता, सक्षमीकरण, शिक्षण व महत्वाचे म्हणजे स्त्री आरोग्याच्या बाबतीत असणारी उदासीनता झटकलेली आहे का हि  बाब तपासणे गरजेचे आहे. शिक्षण, करिअर, आरोग्‍य या सर्वच क्षेत्रात महिला ज्‍या समाजात अग्रेसर असतात तो समाज नेहमीच सन्‍मानाने नांदत असतो व पुढारलेला असतो. महिला सक्षमीकरणासाठी सर्वात महत्‍वाची बाब आहे ती म्‍हणजे महिलांचे शिक्षण. एक महिला शिकली तर अख्‍खे कुटूंब शिकते व अशी अनेक कुटुंबे शिकली तर समाज सुशिक्षित म्‍हणून ओळखला  जातो. त्‍यामुळे प्रत्‍येक कुटुंबात महिलांचे महत्‍व अधोरेखित करायचे असेल, महिलांच्‍या दुबळेपणाचा शिक्‍का पुसून टाकायचा असेल तर महिलांना उच्‍च व कौशल्‍याधारित शिक्षण उपलब्‍ध करुन देणे ही काळाची गरज आहे.  स्त्री शिक्षणाचा पाया ज्‍या फूले दांपत्‍यांने रचला त्‍यांचा उददेश केवळ स्‍त्री जातीलाच संपन्‍न करणे नव्‍हता तर समाजालाही विकासाच्‍या वाटेवर नेवून ठेवण्‍याचा होता. पुरुष प्रधान संस्‍कृतीचा पुरस्‍कार करणा़-या आपल्‍या समाजाची मानसकिता बदलवणे आवश्‍यक असुन स्‍त्री सक्षमीकरणामधील आजची प्रगती पाहता लवकरच या दिशेने मैलाचा दगड आपण गाठू अशी आशा करण्‍यास हरकत नाही.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त