महिलांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे

आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर काम करताना दिसत असून स्त्री पुरुष दरी समाजात बऱ्यापैकी कमी झाली आहे. महिलांना आरक्षण व इतर शासकीय लाभदेखील मिळत असल्याने कुटुंब सांभाळणाऱ्या महिला आज पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रांत कार्यरत आहेत. विविध शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचार व लाचखोरीची पसरलेली कीड सहजासहजी संपुष्टात येणे शक्य नाही. राज्यात दररोज कुठे ना कुठे लाचलुचपत विभागाच्या कचाट्यात अधिकारी कर्मचारी अडकतात व त्यानंतर वाममार्गाने कमवलेली माया मातीमोल ठरते. याची असंख्य उदाहरणे समोर दिसत असतानादेखील लाचखोरांची संख्या कमी होत नाहीये. यात मुख्यत्वे पुरुष अधिकाऱ्यांचा भरणा अधिक आहे. मात्र आता ही कीड महिला अधिकाऱ्यांपर्यंतदेखील पसरू लागल्याने बाब चिंतेची ठरत आहे. महिलांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लाचखोरीपासून महिलांनी चार हात दूर राहायला हवे. कुठल्याही गोष्टीचा अधिक हव्यास आयुष्याची माती करणारा ठरू शकतो. मोजक्या महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा घटनांनी स्त्रियांप्रति सामाजिक दृष्टिकोन दूषित होण्याची व त्याचा फटका कर्तबगार व प्रामाणिक महिलांना बसण्याची भीती आहेच. त्यामुळे मिळालेल्या उत्पन्नात समाधान मानण्याचा  दृष्टिकोन स्त्रियांनी कायम ठेवावा व स्त्री शक्तीला अनुचित व गैर मार्गापासून लांब ठेवावे ही अपेक्षा.


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त