अनेकांना उध्वस्त करणारा संप

एसटी संपाचे फलित काय हा खरेतर मोठा प्रश्न आहे. अव्यवहार्य मागण्यांमुळे चिघळत गेलेला हा संप अनेकांचे आयुष्य उध्वस्त करणारा ठरला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी अनेक वर्षांपासूनची असून सध्याची परिस्थिती पाहता ती पूर्ण करणे अशक्यच आहे ही बाब सर्वपक्षीय राजकर्त्यांना ठाऊक आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील असंख्य महामंडळेदेखील अशीच मागणी करण्याची शक्यता पाहता शासकीय तिजोरी हा भार उचलण्यास सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी ठराविक काळापुरते या संपाचे समर्थन केले. त्यात शासनाकडून वेतनवाढीसारखी महत्वाची मागणी पदरात पाडून घेतल्यावर तरी संप मिटायला हवा होता. मात्र त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेले नेतृत्व अक्षरशः दिशाभूल करणारे ठरले. तब्बल पाच महिन्यांपासून  सुरू असलेल्या आंदोलनाने महामंडळाचे कंबरडे तर मोडलेच पण पगार नसल्याने हजारो कर्मचाऱ्यांची कुटुंबदेखील आर्थिक विवंचनेत आली. एसटीवर अवलंबून अनेक घटक आज एसटी बंद असल्याने प्रचंड त्रासामध्ये आहेत. चुकीच्या नेतृत्वाचा अतिरेक तेव्हा झाला जेव्हा या संपाशी थेट संबंध नसलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत नियोजन केले गेले. याने शंभराच्या वर कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आहे. कायद्याचे राज्य असलेल्या कुठल्याही भागात हे होणारच होते. त्यामुळे आतातरी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले हित लक्षात घेऊन एसटीला पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने लोकांच्या सेवेत आणावे. एसटी महामंडळालादेखील अधिक काळ ही सेवा नुकसान सहन करून चालवणे परवडणारे नाही. याने उद्या एसटीचे खाजगीकरण झाले वा एसटी बंद पडली तर कर्मचारी व प्रवाशांचे काय होईल याचा विचार करायला हवा. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त