विजेचा गरजेपुरताच वापर करा
'मी एकट्याने विजबचत केल्याने काय फरक पडणार आहे' ही सर्वसाधारणपणे आपली भूमिका असते. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणारे फार अपवादानेच आढळतात. त्यामुळेच विजबचत असो की पाणीबचत किंवा इंधनबचत यांच्या बाबतीत भविष्यात उदभवणाऱ्या गंभीर समस्येबद्दल आपण फार 'गंभीर' नसतो. आज राज्यावर मोठे विजसंकट आहे. ग्रामीण भागात तर भारनियमन सुरू झाले आहे. शहरी नागरिकांपर्यंत ते पोहोचण्यास फार विलंब लागणार नाही. विजेची मागणी व निर्मिती यातील मोठया तफावतीमुळे भविष्यात विजसंकट उग्र रूप धारण करणार हे निश्चित आहे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या वापरात झालेली मोठी वाढ हेदेखील कारण या संकटासाठी देता येईल. मात्र विजेचा काटकसरीने व गरजेपुरतच वापर हा एकमेव पर्याय सध्यातरी यासाठी आहे. विजेचा वाढता अनधिकृत वापर, गरज नसताना दिवसा उजेडी पथदिवे सुरू असणे, कार्यालयांमधील अनावश्यकरित्या सुरू असणारी विजेची उपकरणे, घरगुती विजवापराचा अतिरेक या सर्वांचा परिपाक विजेच्या तुटवड्यात झालेला आहे. त्यामुळे विजमंडळाने आता अशा प्रकारे विजेच्या अनधिकृत व वारेमाप वापरावर निर्बंध आणण्यासाठी विशेष पथके स्थापन करून जबाबदार घटकांवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment