स्कुल बसेसची नियमित तपासणी आवश्यक
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
अप्रशिक्षित ड्रायव्हर, नादुरुस्त वाहने, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक व शाळांचे अनियंत्रण यामुळे स्कुल बसचा प्रवास गेल्या काही वर्षांपासून शालेय मुलांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. घर ते शाळेपर्यँच्या प्रवासासाठी पालक मोठ्या विश्वासाने मुलांसाठी स्कुल बसचा पर्याय निवडतात. मात्र दिवसेंदिवस ही वाहतूक अविश्वासार्ह ठरताना दिसत आहे. कोरोना काळात बंद असलेली स्कुल बसची वाहतूक तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. शालेय मुलांच्या वाहतुकीसारखा संवेदनशील विषय हाताळत असताना या बसेसच्या चालक मालकांकडून हवी तशी दक्षता घेतली जात नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. बसमध्ये चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती मुलांची काळजी घेण्यासाठी असणे, ठराविक संख्येत विद्यार्थी बसवणे, बस सुस्थितीत ठेवणे, आसन व्यवस्था योग्य ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार व इतर सुविधा उपलब्ध असणे यासारख्या सोयींची व्यवस्था फार अपवादानेच आढळून येते. परिवहन विभाग व शाळा व्यवस्थापनदेखील या बसेसना घालून दिलेल्या नियमावलीचे पालन नीट होते की नाही याची पडताळणी करत नसल्याने ह्या बसचालकांना मोकळे रान मिळत आहे. याचाच परिपाक म्हणून नुकतीच मुंबईत एक स्कुल बस चक्क चार तासांपेक्षा जास्त काळ गायब होण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर तरी संबंधित यंत्रणा अधिक सतर्कतेने काम करतील अशी अपेक्षा आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment