सेवानिवृत्ती आणि वाढदिवस

आज सकाळी कार्यालयात पोहोचलो तेव्हा टेबलवर पेन व खाऊचा बॉक्स कुणीतरी आणून ठेवला होता. विचारल्यानंतर कळले की, कार्यालयातील नियोजन, विकास व मूल्यमापन विभागातील प्रशासकीय अधिकारी श्री गुरुनाथ पवार यांची सेवानिवृत्ती तसेच खरेदी कक्षातील अधीक्षक श्री राजेश भंकाळ यांचा ५६वा वाढदिवस आज होता. या दोन्हीही व्यक्ती आरोग्य भवन कार्यायातील अत्यंत जेष्ठ, अनुभवी व आपापल्या विभागातील अत्यंत जाणकार म्हणून ओळखल्या जातात. गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांचे स्वभाव, गुणविशेष याची थोडीफार जाणीव आहे. गुरुनाथ पवार हे पीडीई कक्षातील अत्यंत अभ्यासू अधिकारी. या विभागात येणारे प्रस्ताव व त्यांचा पाठपुरावा करण्यात त्यांचा प्रचंड हातखंडा आहे. विभागाचा बृहत आराखडा तयार करण्यातील त्यांची मौलिक भूमिका लपून राहिलेली नाही. कामानिमित्त त्यांना कधीही फोन केल्यास हवी असलेली माहिती काही मिनिटांत उपलब्ध होईल याची खात्री असायची. त्यांच्या ह्याच हजरजबाबीपणामुळे त्यांच्याकडे सोपवलेला वित्त विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभारदेखील ते गेल्या काही महिन्यांपासून समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीने नियोजन विभागात निर्माण होणारी पोकळी न भरून येणारी आहे. बृहत आराखड्यासह ह्या प्रशासकीय विभागातील काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस पवार यांनी कार्यरत असायला हवे होते अशी अपेक्षा वरिष्ठ व्यक्त करतात जी अत्यंत रास्त आहे. राजेश भंकाळ हेदेखील कार्यालय व कार्यालयातील बहुतांश कर्मचार्यांशी भावनिक नाळ जुळलेले अधिकारी. अनेकांना त्यांच्या अडचणीच्या व कठीण समयी केलेल्या मदतीमुळे एक संवेदनशील व भक्कम पाठीराखा म्हणून त्यांची ओळख आहे. एखाद्याला वैयक्तिक पातळीवर केलेले सहकार्य असो की एखाद्या सार्वजनिक उपक्रमात सर्वतोपरी केलेली मदत असो सर्वच बाबतीत त्यांचा सहभाग दखल घेण्याजोगा असतो. वयाची ५६ वर्षे उलटून देखील त्यांचा काम करण्याचा उत्साह दांडगा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खरेदीसारखी किचकट बाब सांभाळताना त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाला आणि कामाला पुरेपूर न्याय दिला. त्यामुळेच विभागातील वरिष्ठांच्यादेखील ते विश्वासातील आहेत. यामुळेच खरेदी कक्षातील प्रशासकीय अधिकारी पदाचा कार्यभार देखील ते सक्षम पणे सांभाळत आहेत. आपल्या शासकीय सेवेतील उर्वरित वर्षेदेखील ते प्रामाणिक, उत्साहवर्धक आणि इतरांच्या अडीअडचणीत ठामपणे उभे राहून कार्यरत राहतील याची खात्री वाटते. अशा ह्या दोन्ही व्यक्तींशी कार्यालयीन कामकानिमित्त सातत्याने संपर्क येतो व त्यांच्यातील मला भावलेल्या विशेषत्वाबद्दल लिहिणे न राहवले म्हणून हा लेख प्रपंच. सवयीनुसार दोघांना त्यांच्या आयुष्यातील हया विशेष दिनी साने गुरुजींची नवा प्रयोग आणि जीवनाचे शिल्पकार ही पुस्तके भेट दिली. दोघांनाही त्यांचे उर्वरित आयुष्य व कारकीर्द यशस्वी, आरोग्यदायी व समाधानी जावो ह्याच सदिच्छा. 

वैभव 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त