जागतिक आरोग्य दिन - आपली पृथ्वी आपले आरोग्य
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
जागतिक आरोग्य दिन विशेष
“आपली पृथ्वी, आपले आरोग्य”
कोविड साथीचा प्रादुर्भाव आता ब-यापैकी कमी झालेला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हयांमध्ये कोविड रुग्णसंख्या एकेरी संख्येवर आलेली आहे. यामुळे कोविड काळात घालण्यात आलेले निर्बंध शासनाने उठवलेले आहेत. नागरीकांचे जनजिवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र जगातील काही देशांमध्ये अजुनही कोविडचे थैमान पाहता व सैल झालेल्या निर्बंधांच्या पार्श्वभुमीवर आता अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभुमीवर ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा होत आहे. या दिवशी स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत एक घोषवाक्य निवडण्यात येते ज्याचा प्रचार व प्रसार जागतिक स्तरावर सर्वत्र करण्यात येतो. या वर्षी जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य “आपली पृथ्वी, आपले आरोग्य” (Our Planet, Our Earth) हे आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचा उददेश यामागे आहे. शासनाच्या माध्यमातुन आज अनेक आरोग्य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सदर योजनांची व्यापक प्रसिध्दी व प्रचार होणे गरजेचे आहे जेणेकरुन जास्तीत जास्त लोकापर्यंत हया आरोग्य सेवा पोहोचतील. लोकांच्या बदललेल्या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असुन त्यांवरील उपचार पध्दती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे. हया आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्यावी लागेल ती स्वच्छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यावर विपरित व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून होते. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्वच्छता हा विकासाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तीक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्व पटविण्यात येत आहे. परदेशात जाऊन आल्यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उदयान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नदया व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येवून काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृध्दींगत होण्यास मदत होईल. स्वच्छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्या क-चयामध्ये सर्वात मोठया प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कच-याची योग्य त्या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करुन विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्वच्छ भारत संकल्पना देशाला अधिक समृध्द व सुंदर बनवणारी असुन यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.
आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वच्छतेची शपथ घेऊन आपला परिसर व घर स्वच्छ राखण्याचा संकल्प करु या आणि “आपली पृथ्वी, आपले आरोग्य'' हा गजर सर्वत्र करु या.
जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment