१२ मे - जागतिक परिचारिका दिन

जागतिक परिचारीका  दिनाच्‍या निमित्‍ताने..
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे हा वाढदिवस हा जागतिक परिचारीका दिन म्‍हणून साजरा केला जातो. त्‍या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. सन १८५३ साली झालेल्या युध्‍दात जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्‍यानंतर त्यांचे नाव प्रसिद्धीझोतात आले. तसेच त्यांना "लेडी विथ द लॅम्प" असेही म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही मानवतेची सेवा करण्यासाठीच आपला जन्‍म झाला अशा भावनेने त्या प्रेरित होत्या. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो. वैदयकीय क्षेत्रामध्‍ये परिचारीका म्‍हणजेच नर्सचे महत्‍व अव्‍दीतीय व अबाधित आहे. डॉक्‍टरनंतर नर्स हा रुग्‍णसेवेच्‍या दृष्‍टीने सर्वात निगडीत घटक असतो. कोरोना काळात तर बाधित रुग्‍णांच्‍या सेवेत हया नर्सेस अहोरात्र झटत राहील्‍या. त्‍यामूळेच कोरोनावर नियंत्रण मिळाल्‍याचे मोठे श्रेय या परिचारीकांचेही आहे. महिला म्‍हणून आरोग्‍य सेवेची कर्तव्‍ये पार पाडत असताना कौटुंबिक जबाबदा-यांतुनदेखील तिला हात झटकता येत नाहीत. म्‍हणूनच या दोन्‍ही पातळयांवर काम करणा-या या परिचारीकांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. शासकीय आरोग्‍य संस्‍थांबरोबरच खाजगी वैदयकीय क्षेत्रात काम करणा-या नर्सेसदेखील तितक्‍याच सक्षमतेने या जबाबदा-या निभावत असतात. सर्वच रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णसेवेत या नर्सेसची भुमिका एकमेवाव्दितीय आहे. डॉक्‍टरपेक्षा नर्स ही मानसिकदृष्‍टया रुग्‍णाच्‍या अधिक जवळची असते. रुग्‍णास भेडसावणा-या समस्‍या, व्‍याधी यांची जाण नर्सला जास्‍त प्रमाणात असते. बेडवरील रुग्‍ण काहीही लागल्‍यास, दुखल्‍यास, आजाराबददल काही सांगावयाचे असल्‍यास अगोदर नर्सला सांगतो. रुग्‍णाला गोळया, औषधे, इंजेक्‍शने वेळेवर देण्‍याची जबाबदारी नर्सच पार पाडते. महिलेच्‍या गरोदरपणातील उपचार असो की तिची सुखरुप प्रसुती असे सर्वच बाबतीत नर्स आघाडीवर कार्यरत असते. त्‍यामुळे कुठल्‍याही रुग्‍णास हॉस्‍पीटलमधील नर्स हीच आजारपणात जवळची वाटते. सध्‍या रुग्‍णसेवेची वाढती व्‍याप्‍ती व अनेकविध आजारांचा वाढता प्रसार पाहता शहरी व ग्रामीण भागात काम करणा-या सरकारी परिचारीकांवरील कामाचा भार वाढता आहे. विविध आजारांच्‍या अनुषंगाने सर्व्‍हेक्षणे, अहवाल सादरीकरण याबरोबरच प्रत्‍यक्ष रुग्‍णसेवेचे कामदेखील करावे लागत आहे. नर्सेस हया रुग्‍ण व रुग्‍णालय यांच्‍यामधील महत्‍वाचा दुवा म्‍हणून काम करतात. दरवर्षी १२ मे ह्या फ्लोरेंस नायटिंगेल यांच्या जन्मदिवस प्रसंगी केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय फ्लोरेंस नायटिंगेल पुरस्कार देण्यात येतो. ज्‍यामध्‍ये अनेक नर्सेसना त्‍यांच्‍या उत्‍तम कामगिरीसाठी शासनामार्फत गौरवले जाते. रुग्‍णसेवेत कर्तव्‍यदक्ष, उदात्‍त, संवेदनशील भावनेने कार्यरत असणा-या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारीका  दिनाच्‍या निमित्‍ताने मनःपूर्वक शुभेच्‍छा. 



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त