महागाईवर नियंत्रण हवे

देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह इंधन, गॅस, साबण, तेल, इलेक्ट्रिक वस्तू, गृहखरेदी, विविध सरकारी कर महागल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बजेट पुरते कोलमडले आहे. येत्या काही दिवसांत बेकरी उत्पादनेदेखील महाग होणार आहेत. त्यामुळे गरिबांनी खावे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारी कर व इंधन महागल्याने ही भाववाढ केली जात आहे. वास्तविक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करून सरकारने लोकांना दिलासा द्यायला हवा. करवाढ करण्यासाठी इतर अनेक मार्ग असताना सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील ही दरवाढ संताप आणणारी आहे. विदेशी वस्तू, मद्य, भांडवलदारांवर करवाढ करून सरकारची तिजोरी भरता येऊ शकते. तसेच सरकारी तिजोरीवरील अनावश्यक अर्थभार कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठमोठ्या प्रकल्पांसाठी कर्जे घेऊन कर्जाचा डोंगर उभा करणे योग्य नाही. कोरोनाने मंदावलेली देशाची अर्थव्यवस्था रुळावर येईपर्यंत सरकारी खर्चातून नवे प्रकल्प न राबवता केवळ अत्यावश्यक सेवांवर खर्च करण्यात यावा. सातत्याने करवाढ करून लोकांना महागाईच्या खाईत ढकलणे योग्य नाही.   



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त