अनधिकृत शाळांचा विषय गंभीर
शाळा मान्यतेसाठी शासनाचे ठराविक निकष ठरलेले आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी विहित प्रक्रिया व कालमर्यादेचे पालन करून शाळेला मान्यता घेण्याचे सोपस्कार पार पाडणे अपेक्षित असते. मात्र अनेक संस्था शासनमान्यता नसताना शाळा सुरू करण्याचा अट्टाहास करतात, पालकांना शाळेस मान्यता असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. मात्र त्यानंतर शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यावर पालक व शाळा प्रशासन असा संघर्ष निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्याचे नुकसान होते ते निराळेच. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेची जबाबदारी आहे की अशा मान्यता नसलेल्या शाळांबाबत शहरवासीयांना वेळीच अवगत करावे. मात्र पालिकेमार्फत सातत्याने अशा शाळांची नावे जाहीर करण्यास विलंब केला जातो. साधारणतः डिसेंबर जानेवारी च्या दरम्यान शाळा प्रवेश सुरू होतात. त्यामुळे त्या कालावधीतच अनधिकृत शाळांची यादी समोर यायला हवी. मात्र त्यात दिरंगाई होत असल्याने अनेक पालकांची फसगत होण्याची शक्यता वाढते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी निगडित संवेदनशील व महत्वपूर्ण बाबीकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहायला हवे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment